मालमत्तेच्या वादातून सख्ख्या पुतण्याची निर्घृण हत्या करणाऱ्या नराधम काकाला बेळगाव न्यायालयाने जन्मठेपेची कठोर शिक्षा सुनावली आहे. या खटल्यात लहान मुलांनी दिलेल्या प्रत्यक्षदर्शी साक्षीच्या आधारे न्यायालयाने हा महत्त्वपूर्ण निकाल दिला आहे.


बेळगाव जिल्ह्यातील सवदत्ती तालुक्यातील हारुगोप्प गावात २०२१ मध्ये सिद्धार्थ संकन्नवर या सहा वर्षांच्या बालकाची निर्घृण हत्या करण्यात आली होती. या प्रकरणाची सुनावणी पूर्ण झाली असून बेळगाव येथील प्रधान जिल्हा व सत्र न्यायालयाने ऐतिहासिक निकाल दिला आहे. आपला भाऊ वीरेश याच्याशी असलेल्या मालमत्तेच्या वादातून आरोपी ईरप्पा संकन्नवर याने पुतण्याची हत्या केली होती. या प्रकरणी न्यायाधीश मंजुनाथ नायक यांनी आरोपीला आजन्म कारावास आणि ७५ हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली आहे. आरोपीने विळ्याने पाच ते सहा वार करून बालकाची हत्या केली होती, तसेच दुसऱ्या एका मुलालाही जीवे मारण्याचा प्रयत्न केला होता.

या खटल्याच्या सुनावणीत तीन लहान मुलांची साक्ष अत्यंत निर्णायक ठरली. कोणत्याही भीतीशिवाय या मुलांनी घडलेला सर्व प्रकार न्यायालयासमोर मांडला होता. सरकारी वकील नारायण आरी यांचा प्रभावी युक्तिवाद आणि पोलीस विभागाने सादर केलेले सबळ पुरावे ग्राह्य धरून न्यायालयाने ही कठोर शिक्षा सुनावली आहे. दंडाच्या रकमेतील २५ हजार रुपये मृत बालकाच्या वडिलांना देण्याचे निर्देश न्यायाधीश मंजुनाथ नायक यांनी दिले आहेत. याप्रकरणी सरकारी वकील नारायण आरी यांनी कामकाज पहिले.


Recent Comments