Khanapur

लोंढा बसस्थानकाच्या दुरवस्थेविरोधात कर्नाटक युवा रक्षण वेदिकेचा एल्गार

Share

खानापूर तालुक्यातील लोंढा बसस्थानकाच्या विविध समस्यांसंदर्भात कर्नाटक युवा रक्षण वेदिकेच्या लोंढा ग्राम घटकाच्या वतीने खानापूर सार्वजनिक बांधकाम विभाग आणि बस आगार व्यवस्थापकांना निवेदन देऊन तातडीने कारवाई करण्याची मागणी करण्यात आली.

बसस्थानक परिसरात रस्ते उखडल्यामुळे वयोवृद्ध नागरिक, महिला आणि विद्यार्थ्यांचे प्रचंड हाल होत आहेत. विशेषतः पावसाळ्यात या भागात पाणी साचून चिखलाचे साम्राज्य निर्माण होते, ज्यामुळे बसमध्ये चढताना आणि उतरताना प्रवाशांना मोठी कसरत करावी लागते. प्रवाशांच्या सोयीसाठी बसस्थानकात सुसज्ज प्लॅटफॉर्म आणि पक्क्या रस्त्यांचे काम तातडीने पूर्ण करावे, अशी विनंती या निवेदनाद्वारे करण्यात आली.

याप्रसंगी संघटनेचे खानापूर तालुका अध्यक्ष पांडुरंग गुळन्नवर यांनी प्रशासकीय अनास्थेवर तीव्र नाराजी व्यक्त केली. लोंढा हे महत्त्वाचे केंद्र असूनही प्रवाशांना मूलभूत सुविधांपासून वंचित राहावे लागत असल्याने त्यांनी संताप व्यक्त केला. सार्वजनिक हितासाठी हे काम लवकरात लवकर हाती न घेतल्यास आगामी काळात तीव्र आंदोलन छेडले जाईल, असा इशारा संतोष चितळे आणि परशुराम चिकमनी यांनी दिला आहे.

यावेळी जयवंत नाईक, बिलाल अब्बासी, संतोष चलवादी, उमरफारूक मुल्ला, रामा होसमनी, जुनेद शेख यांच्यासह संघटनेचे अनेक पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते.

Tags: