हुक्केरी येथील हिरण्यकेशी नदीचा परिसर आणि बडकुंद्री होलेम्मा मंदिर परिसरात संत निरंकारी मंडळ व बेळगावच्या गोगटे तांत्रिक महाविद्यालयाच्या एन.एस.एस. विद्यार्थ्यांनी विशेष स्वच्छता मोहीम राबवली.


हुक्केरी शहर आणि विभागीय संत निरंकारी मंडळाच्या सदस्यांनी हिरण्यकेशी नदीच्या पात्रातील प्लास्टिक आणि टाकाऊ वस्तू गोळा करून त्यांची विल्हेवाट लावली. ‘स्वच्छ जल स्वच्छ मन’ या घोषवाक्याखाली ही मोहीम राबवून नदीकाठावरील कचरा आणि साचलेली घाण दूर करण्यात आली.

स्वच्छता मोहिमेनंतर आयोजित सत्संग कार्यक्रमात रायबाग, मोरब, दड्डी, निलजी यांसह विविध भागांतील भाविक सहभागी झाले होते. संत निरंकारी मंडळ आणि चॅरिटेबल ट्रस्टच्या वतीने माता सुदीक्षा यांच्या मार्गदर्शनाखाली कर्नाटक जोनल प्रमुख सुनीलकुमार नात्रा यांच्या सूचनेनुसार हे अभियान राबवण्यात आले, अशी माहिती ज्ञान प्रचारक मारुती मोरे यांनी दिली.

आमच्या महाविद्यालयाच्या एन.एस.एस. विद्यार्थ्यांचे गेल्या सात दिवसांपासून होलेम्मा मंदिरात शिबिर सुरू असून, निरंकारी मंडळाच्या सहकार्याने या स्वच्छता कार्यात सहभागी होण्याची संधी मिळाली, अशी भावना गोगटे महाविद्यालयाचे प्राध्यापक राजपूत यांनी व्यक्त केली.
या प्रसंगी विभागीय समन्वयक भागोजी कालुंगडे, अमरसिंग पाटील, महादेव होनकुप्पी यांच्यासह भरमण्णा जाधव, सिद्धू बेनाडिकर आणि मोठ्या संख्येने सेवा दलाचे सदस्य उपस्थित होते.


Recent Comments