एम. के. हुबळी शहरातील डॉ. बाबू जगजीवनराम भवनाच्या जागेवरील अतिक्रमण हटवणे आणि विविध प्रलंबित मागण्यांसाठी आज, २३ फेब्रुवारीपासून पट्टाण पंचायत आवारात ‘अहोरात्र’ धरणे आंदोलनाला सुरुवात झाली आहे.

डॉ. बाबू जगजीवनराम भवनाच्या जागेवर झालेले अतिक्रमण तातडीने हटवण्यात यावे, या प्रमुख मागणीसाठी कर्नाटक राज्य दलित संघर्ष समितीने हे आंदोलन पुकारले आहे. तलावाशेजारी असलेल्या शासकीय मुलींच्या शाळेत पावसाळ्यात सापांचा शिरकाव होत असल्याने, विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेसाठी शाळेला तात्काळ संरक्षक भिंत बांधण्याची मागणी करण्यात आली आहे.
या आंदोलनाद्वारे शहरातील शासकीय रुग्णालयाचा दर्जा उंचावणे आणि SCP/TSP निधीच्या गैरवापराची चौकशी करण्याची मागणी लावून धरली आहे. एम. के. हुबळी शहराच्या सर्वांगीण विकासासाठी हे आंदोलन छेडण्यात आले असून मागण्या मान्य होईपर्यंत माघार न घेण्याचा पवित्रा आंदोलकांनी घेतला आहे.
आज सकाळी ११ वाजल्यापासून सुरू झालेल्या या आंदोलनात संघटनेचे कार्यकर्ते, पदाधिकारी आणि स्थानिक नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले आहेत. प्रशासनाने या प्रश्नांची तातडीने दखल घ्यावी, अशी मागणी यावेळी करण्यात आली.


Recent Comments