Belagavi

बेळगावात उद्या ‘कन्नड राज्योत्सव’ सोहळा

Share

बेळगावमध्ये २४ फेब्रुवारी रोजी ‘कन्नड राज्योत्सव’ साजरा केला जाणार असून, सायंकाळी ५ वाजता प्रसिद्ध गायक विजय प्रकाश आणि अनुराधा भट यांच्या चमूकडून संगीत संध्येचे आयोजन करण्यात आले आहे, अशी माहिती जिल्हाधिकारी मोहम्मद रोशन यांनी दिली.

आज आयोजित पत्रकार परिषदेत जिल्हाधिकारी मोहम्मद रोशन बोलत होते. सीमा विकास आणि पर्यटन मंत्री एच.के. पाटील यांच्याकडून या सोहळ्यासाठी ५० लाख रुपये मंजूर करण्यात आले आहेत. यातील ३ लाख रुपये प्रदर्शनासाठी आणि उर्वरित ४७ लाख रुपये मुख्य कार्यक्रमासाठी वापरण्याचा निर्णय कन्नड संघटनांच्या बैठकीत घेण्यात आला आहे. सुमारे ८ लाख रुपये जनसामान्यांच्या भोजनासाठी राखीव असून, उर्वरित ३९ लाख रुपयांतून भव्य सोहळा साजरा करण्याची जबाबदारी महानगरपालिका आयुक्तांकडे सोपवण्यात आली आहे, असे मोहम्मद रोशन यांनी सांगितले.

कार्यक्रमाबाबत कन्नड संघटनांमध्ये काही साशंकता असल्यास पुन्हा बैठक घेतली जाईल. हा विषय पालकमंत्र्यांच्याही निदर्शनास आणून दिला आहे. शेवटच्या १० दिवसांत काही बदल झाले असून, सर्व गोंधळ दूर करण्यासाठी संघटनांशी समन्वय साधून एकमताने निर्णय घेतला जाईल, अशी प्रतिक्रिया मोहम्मद रोशन यांनी व्यक्त केली.

महानगरपालिका आयुक्त कार्तिक एम. यांनी माहिती देताना सांगितले की, २४ फेब्रुवारी रोजी सायंकाळी ५ वाजता जिल्हा क्रीडा संकुलात संगीत रजनी पार पडणार आहे. या कार्यक्रमाला जिल्ह्याचे पालकमंत्री सतीश जारकीहोळी, पर्यटन मंत्री एच.के. पाटील, महिला आणि बालविकास मंत्री लक्ष्मी हेब्बाळकर यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित राहणार आहेत, असे कार्तिक एम. यांनी स्पष्ट केले.

या प्रसंगी महानगरपालिका आयुक्त एम. कार्तिक यांच्यासह इतर वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

Tags: