Belagavi

बेळगावात जिल्हाधिकाऱ्यांच्या कार्यपद्धतीविरुद्ध कन्नड संघटना आक्रमक

Share

मागील वर्षीच्या राज्योत्सवासाठी मंजूर झालेल्या ५० लाखांच्या निधीतून उद्या मंगळवारी घाईघाईने आयोजित केलेल्या कार्यक्रमावरून बेळगावातील कन्नड संघटनांनी जिल्हाधिकाऱ्यांविरुद्ध तीव्र संताप आणि आक्रमक पवित्रा घेतला आहे.

सोमवारी सकाळी बेळगावमधील कन्नड साहित्य भवनात विविध संघटनांची महत्त्वाची बैठक पार पडली. यावेळी जिल्हाधिकारी मोहम्मद रोशन यांच्या कार्यपद्धतीचा निषेध करत कार्यकर्त्यांनी त्यांच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी केली.

उद्या होणाऱ्या सांस्कृतिक कार्यक्रमाबाबत बेळगावची जनता आणि प्रसारमाध्यमांना कोणतीही अधिकृत माहिती देण्यात आलेली नाही. गेल्या ऑक्टोबरमध्ये बेंगळुरू येथे मंत्री एच. के. पाटील यांच्यासोबत झालेल्या बैठकीनंतर ५० लाखांचा निधी मंजूर झाला होता. या निधीतून नामवंत साहित्यिक आणि माजी अधिकाऱ्यांचा सत्कार करण्याचे कन्नड संघटनांनी ठरवले होते. मात्र, जिल्हाधिकाऱ्यांनी संघटनांना विश्वासात न घेता हा कार्यक्रम परस्पर ठरवल्याने तो निषेधार्ह आहे, असे मत उपस्थित नेत्यांनी व्यक्त केले. केवळ ५० लाख रुपयांच्या निधीची विल्हेवाट लावण्याच्या उद्देशानेच जिल्हाधिकाऱ्यांनी कन्नड संघटनांना बाजूला सारून हा कार्यक्रम आखला आहे, असा आरोप कन्नड नेत्यांनी केला आहे.

उद्याच्या कार्यक्रमाला उपस्थित राहणे शक्य नसल्याचे सीमा विकास मंत्री एच. के. पाटील यांनी कळवले असल्याची माहिती अशोक चंदरगी यांनी बैठकीत दिली. जिल्हाधिकाऱ्यांच्या या आडमुठ्या धोरणाचा निषेध म्हणून उद्याच्या कार्यक्रमावर बहिष्कार टाकण्याचा निर्णय बैठकीत घेण्यात आला.

या बैठकीत कन्नड कार्यकर्ते महादेव तलवार, अशोक चंदरगी, नगरसेवक रमेश सोंटक्की, श्रीनिवास ताळुकर, वाजीद हिरेकोडी, बलराम मासेनट्टी, मैनुद्दीन मकानदार, देवेंद्र तलवार, महेश शिगीहळ्ळी, शिवू देवर, गौस सनदी, संतोष तळीमनी, नागेश कोप्पद, बाळेश गुडगनट्टी आणि प्रकाश मूकनवर या मान्यवरांनी आपली मते मांडली.

Tags: