Kagawad

२०२८ सालीही कागवाड मधून मीच निवडणूक लढवणार : आम. राजू कागे ​

Share

​कगवाड विधानसभा मतदारसंघातून २०२८ च्या निवडणुकीसाठी काँग्रेस पक्षाकडून आपणच निवडणूक लढवणार असल्याचे आमदार राजू कागे यांनी स्पष्ट केले आहे. सोमवारी विकासकामांच्या कार्यक्रमादरम्यान त्यांनी आपल्या प्रकृतीबाबतच्या अफवा फेटाळून लावत राजकीय वाटचालीचा निर्धार व्यक्त केला.

​येणाऱ्या २०२८ च्या विधानसभा निवडणुकीत काँग्रेस पक्षाचा अधिकृत उमेदवार म्हणून मीच रिंगणात उतरणार असल्याचे राजू कागे यांनी ठामपणे सांगितले. मतदारसंघातील विविध विकासकामांच्या पूजा समारंभाप्रसंगी माध्यमांशी संवाद साधताना त्यांनी ही घोषणा केली.

​गेल्या काही दिवसांपासून आपल्या प्रकृतीबाबत विरोधकांकडून पसरवल्या जाणाऱ्या वावड्यांवर त्यांनी तीव्र संताप व्यक्त केला. आपल्याला कोणताही गंभीर आजार नसून केवळ पायाच्या बोटाला दुखापत झाली आहे, असे सांगत मी पूर्णपणे निरोगी आणि सक्षम आहे, असे राजू कागे यांनी स्पष्ट केले.

​लोकशाहीत प्रत्येकाला आपले मत मांडण्याचे स्वातंत्र्य असले तरी, जाणीवपूर्वक चुकीची माहिती पसरवणे योग्य नाही. विरोधकांनी माझी चिंता करण्यापेक्षा स्वतःच्या कामाकडे लक्ष द्यावे, अशा शब्दांत राजू कागे यांनी विरोधकांना टोला लगावला.

​राज्य सरकारकडून मतदारसंघाच्या विकासासाठी मोठा निधी प्राप्त झाला असून, अनेक कामे प्रगतीपथावर आहेत. लवकरच तलाव भरण्याची महत्त्वपूर्ण योजना पूर्ण केली जाईल. ६ ते २७ मार्च दरम्यान होणाऱ्या अधिवेशनानंतर उर्वरित कामांना गती दिली जाईल, अशी माहिती राजू कागे यांनी दिली.

Tags: