Dharwad

आम. लमाणींवरील लोकायुक्त कारवाईमागे काँग्रेसचे राजकीय षडयंत्र : मुरगेश निराणी

Share

कोणतेही विकासकाम न करता केवळ विषयांतर करण्यासाठी काँग्रेसने षडयंत्र रचून आमदार चंद्रू लमाणी यांच्यावर लोकायुक्त धाड टाकली आहे, असा खळबळजनक आरोप माजी मंत्री मुरगेश निराणी यांनी केला आहे.

धारवाड येथे प्रसारमाध्यमांशी बोलताना मुरगेश निराणी यांनी राज्यातील काँग्रेस सरकारवर जोरदार टीका केली. राज्यात काँग्रेसमध्ये गेल्या तीन वर्षांपासून तीन गट सक्रिय झाले आहेत. आमदार लमाणी यांच्या प्रकरणात काही ऑडिओ क्लिप समोर आल्या आहेत, मात्र पैसे दिल्याचा कोणताही ठोस पुरावा नाही. आमदार चंद्रू लमाणी हे प्रामाणिक असून त्यांना खोट्या प्रकरणात अडकवण्यासाठी हा सर्व प्रपंच रचला गेला आहे. या प्रकरणाची सखोल चौकशी करून सत्य जनतेसमोर यावे आणि दोषींना शिक्षा व्हावी. या संपूर्ण कारवाईमागे काँग्रेसचाच हात आहे, असे मुरगेश निराणी यांनी म्हटले आहे.

मुख्यमंत्र्यांच्या सोशल मीडिया पोस्टवर भाष्य करताना निराणी म्हणाले की, पहिल्या कार्यकाळात मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी चांगले प्रशासन दिले होते, मात्र दुसऱ्या कार्यकाळात ते पूर्णपणे अपयशी ठरले आहेत. सिद्धरामय्या यांना भाजप किंवा जेडीएस दाबण्याचा प्रयत्न करत नाही, तर स्वतः काँग्रेस पक्षच त्यांना संपवत आहे. काँग्रेसमधील गटबाजी चव्हाट्यावर आली असून, त्यांनी चार भिंतींच्या आत हे वाद मिटवून राज्याला चांगले प्रशासन द्यायला हवे होते, अशी प्रतिक्रिया मुरगेश निराणी यांनी व्यक्त केली.

Tags: