
सद्गुरू हरदेव सिंह महाराज यांच्या जयंतीनिमित्त खानापूर येथील मलप्रभा नदीकाठी भव्य स्वच्छता अभियान राबवण्यात आले. ‘स्वच्छ जल, स्वच्छ मन’ या घोषवाक्यासह शेकडो स्वयंसेवकांनी या पर्यावरण सेवेत सक्रिय सहभाग नोंदवला.


सद्गुरू हरदेव सिंह महाराज यांच्या जयंतीचे औचित्य साधून रविवारी २२ फेब्रुवारी रोजी संत निरंकारी चॅरिटेबल फाउंडेशनच्या वतीने खानापूर येथे ‘प्रोजेक्ट अमृत’ अंतर्गत मलप्रभा नदीची स्वच्छता करण्यात आली. या अभियानात निरंकारी मिशनच्या १०० हून अधिक महिला आणि पुरुष स्वयंसेवकांनी उत्साहाने सहभागी होऊन नदीकाठावरील कचरा आणि प्लास्टिक कचऱ्याची विल्हेवाट लावली. या मोहिमेला खानापूरचे पोलीस अधिकारी, वन विभाग आणि नगर पंचायतीच्या अधिकारी-कर्मचाऱ्यांनी उपस्थित राहून पाठिंबा दर्शवल्याचे फाउंडेशनच्या पदाधिकाऱ्यांनी सांगितले.

देशभरातील जलस्त्रोतांच्या संवर्धनासाठी संत निरंकारी चॅरिटेबल फाउंडेशनने एकाच वेळी भारतातील १५०० हून अधिक ठिकाणी नदी, तलाव आणि समुद्रकिनाऱ्यांवर स्वच्छता अभियान राबवले आहे. खानापूर येथे झालेल्या या उपक्रमाने नागरिकांमध्ये पर्यावरणाबाबत जनजागृती करण्यात यश मिळवले. पाण्याचे स्त्रोत पवित्र राखणे आणि मानवी मन निर्मळ ठेवणे हाच ‘प्रोजेक्ट अमृत’ अभियानाचा मुख्य उद्देश असल्याचे संस्थेच्या पदाधिकाऱ्यांनी स्पष्ट केले.



Recent Comments