बेळगाव तालुक्यातील पिरनवाडी येथे छत्रपती शिवाजी महाराजांच्या नूतन अश्वारूढ मूर्तीचे मोठ्या उत्साहात आगमन झाले. पंचक्रोशीतील शिवभक्तांच्या उपस्थितीत निघालेल्या या भव्य मिरवणुकीने संपूर्ण गाव भगवेमय झाले होते.

पिरनवाडी येथील शिवछत्रपती सेवा स्मारकाच्या वतीने भव्य अश्वारूढ मूर्तीची प्रतिष्ठापना केली जात आहे. सुमारे २५ वर्षांनंतर हा सोहळा होत असल्याने ग्रामस्थांमध्ये मोठा उत्साह होता. डीजेचा वापर न करता ढोल-ताशा आणि ध्वजपथकांच्या निनादात पारंपरिक पद्धतीने ही मिरवणूक काढण्यात आली.
मिरवणुकीत भजन मंडळांचा सहभाग आणि साहसी खेळांची प्रात्यक्षिके आकर्षणाचे केंद्र ठरली. विशेष म्हणजे मराठा, धनगर समाजासह गावातील सर्वच समाजबांधवांनी एकत्र येत सामाजिक ऐक्याचे दर्शन घडवले.
हा क्षण ऐतिहासिक असून सर्व समाजातील लोक एकजुटीने या कार्यात सहभागी झाले आहेत, अशी प्रतिक्रिया समिती प्रमुखांनी व्यक्त केली.
पिरनवाडी परिसरात दिवसभर शिवभक्तांचा राबता असून जयघोषाने संपूर्ण वातावरण शिवमय झाले होते.


Recent Comments