बेळगावच्या वैद्यकीय क्षेत्रात आज सुवर्ण अक्षरांनी नवा इतिहास लिहिला गेला आहे. एस. एस. जंबगी स्मृती शिक्षण आणि चॅरिटेबल ट्रस्टच्या वतीने उभारण्यात आलेल्या ‘जंबगी सुपरस्पेशालिटी आय इन्स्टिट्यूट’चे आज दिमाखदार सोहळ्यात लोकार्पण करण्यात आले. जागतिक दर्जाचे अत्याधुनिक तंत्रज्ञान बेळगावात उपलब्ध करून देत या संस्थेने नेत्रचिकित्सा क्षेत्रात नवा मैलाचा दगड प्रस्थापित केला आहे.


बेळगावमधील नेहरू नगर येथील कोल्हापूर सर्कल जवळ असलेल्या ‘जंबगी सुपरस्पेशालिटी आय इन्स्टिट्यूट आणि बेळगाव लेझर अँड कॉन्टॅक्ट लेन्स क्लिनिक’चा प्रारंभ करण्यात आला. या संस्थेमुळे उत्तर कर्नाटकातील जनतेला नेत्रोपचारासाठी बेंगळुरू किंवा इतर महानगरांकडे धाव घेण्याची गरज उरणार नाही. विशेष म्हणजे, बेंगळुरूबाहेर कर्नाटक राज्यात पहिल्यांदाच ‘Zeiss Mel 90’ हे जगातील सर्वात वेगवान लेझर तंत्रज्ञान येथे कार्यान्वित करण्यात आले आहे. महिला आणि बालविकास मंत्री लक्ष्मी हेब्बाळकर, माजी राज्यसभा सदस्य तथा केएलई संस्थेचे कार्याध्यक्ष पद्मश्री डॉ. प्रभाकर कोरे, संस्थेचे वैद्यकीय संचालक डॉ. अमोघ एल. जंबगी, डॉ. जगदीश बी. पाटील, विट्रिओरेटिनल सर्जन डॉ. हेमंत आर., ग्लुकोमा तज्ज्ञ डॉ. स्नेहा ए. भांदुर्गे आणि पेडियाट्रिक नेत्रतज्ज्ञ डॉ. मिताली शाह यांच्या प्रमुख उपस्थितीत या नूतन संस्थेचे उद्घाटन संपन्न झाले.

याप्रसंगी बोलताना माजी राज्यसभा सदस्य आणि केएलई संस्थेचे कार्याध्यक्ष पद्मश्री डॉ. प्रभाकर कोरे यांनी बेळगावात या रुग्णालयाची झालेली सुरुवात ऐतिहासिक असल्याचे नमूद केले. “मी यापूर्वी त्यांच्या हारुगेरी येथील रुग्णालयाचे उद्घाटन केले होते आणि आज बेळगावमधील या अद्ययावत रुग्णालयाचे उद्घाटन करण्याचे भाग्य मला लाभले आहे,” असे सांगत त्यांनी बेळगावच्या वैद्यकीय इतिहासाला उजाळा दिला.

आंतरराष्ट्रीय स्तरावर बेळगावचे नाव आरोग्य क्षेत्रात उज्ज्वल करणे हेच केएलई संस्थेचे ध्येय असल्याचे सांगून ते पुढे म्हणाले की, “पूर्वी मुंबई किंवा बेंगळुरूशिवाय अशा प्रकारची अत्याधुनिक उपकरणे उपलब्ध नव्हती, मात्र आता बेळगावच्या नागरिकांना कुठेही जाण्याची आवश्यकता नाही. जंबगी रुग्णालयाने सर्व सुविधा येथेच उपलब्ध करून दिल्या आहेत. हे रुग्णालय नसून एखाद्या पंचतारांकित हॉटेलसारखे स्वच्छ आणि सुंदर आहे. लक्ष्मण जंबगी यांच्या कष्टांमुळेच हारुगेरी रुग्णालयाला जनमान्यता मिळाली असून, येथील तज्ज्ञ डॉक्टरांच्या मार्गदर्शनाखाली ही संस्था निश्चितच यशस्वी होईल,” असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

महिला आणि बालविकास मंत्री लक्ष्मी हेब्बाळकर यांनी बेळगाव हे सर्वच क्षेत्रांत झपाट्याने प्रगती करणारे शहर असल्याचे गौरवोद्गार काढले. गेल्या ४० वर्षांत वैद्यकीय क्षेत्रात अनेक क्रांतिकारक बदल झाले असून बेळगावात विश्वासार्ह रुग्णालयांची मोठी साखळी असल्याचे त्यांनी सांगितले. जंबगी यांनी उभारलेल्या या भव्य रुग्णालयाचे कौतुक करताना त्या म्हणाल्या की, “आधुनिक तंत्रज्ञान आणि परदेशी उपकरणांच्या माध्यमातून रुग्णांना दर्जेदार उपचार देण्याचा घेतलेला हा पुढाकार कौतुकास्पद आहे. बेळगावसह राज्यातील सर्वच रुग्णांनी या जागतिक दर्जाच्या सुविधेचा लाभ घ्यावा,” अशा शब्दांत त्यांनी आपल्या शुभेच्छा व्यक्त केल्या.

हैदराबाद येथील सुप्रसिद्ध एल.व्ही. प्रसाद आय इन्स्टिट्यूटचे सहकार्य या संस्थेला लाभले आहे, हे विशेष. येथे रोबोटिक कॅटॅरॅक्ट सर्जरी (Alcon Unity 4D), चष्मा काढण्यासाठी अत्याधुनिक लेसिक आणि स्माईल उपचार, रेटिना सर्जरी व कॉर्निया सेवा उपलब्ध आहेत. या कार्यक्रमास डॉ. लक्ष्मण एस. जंबगी, डॉ. वर्षा एल. जंबगी, डॉ. प्रेरणा ए. जंबगी यांच्यासह जंबगी आणि होसाळे कुटुंबातील सदस्य व मान्यवर उपस्थित होते.



Recent Comments