बेळगाव जिल्ह्यातील रामदुर्ग येथे स्मशानभूमीला रस्ता नसल्याने चक्क मृतदेह रस्त्यावर ठेवून नातेवाईकांनी प्रशासनाचा निषेध केला. गेल्या अनेक दशकांपासून प्रलंबित असलेल्या या समस्येकडे अधिकाऱ्यांनी दुर्लक्ष केल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे.

बेळगाव जिल्ह्यातील रामदुर्ग तालुक्यातील निंगदाळ गावात अंत्यसंस्कारासाठी स्मशानभूमीला रस्ताच नसल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. यापूर्वी एका शेतकऱ्याने आपल्या शेतातून रस्ता दिला होता, मात्र सरकारी मोजणीत ती खाजगी जमीन असल्याचे सिद्ध झाल्याने तो रस्ता बंद करण्यात आला. यामुळे मृतदेह स्मशानभूमीत नेणे अशक्य झाल्याने संतप्त नातेवाईक आणि ग्रामस्थांनी रामदुर्ग-सुरेबान मुख्य रस्त्यावर मृतदेह ठेवून रास्ता रोको आंदोलन केले.
गेल्या अनेक वर्षांपासून रस्ता उपलब्ध करून देण्यासाठी तहसीलदारांना वारंवार विनंती करूनही कोणताही प्रतिसाद न मिळाल्याने ग्रामस्थांचा संयम सुटला. आंदोलनाची दखल घेत घटनास्थळी दाखल झालेले तहसीलदार प्रकाश होळेप्पगोळ यांना ग्रामस्थांनी चांगलेच धारेवर धरले. “आम्हाला पोकळ आश्वासने नकोत, रस्ता द्या”, असा पवित्रा ग्रामस्थांनी घेतल्याने परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. सुरेबान पोलीस ठाण्याच्या हद्दीत हे आंदोलन झाले असून प्रशासनाकडून ग्रामस्थांची समजूत काढण्याचे प्रयत्न सुरू आहेत.


Recent Comments