कर्तृत्वाला मिळालेल्या सन्मानाला जर थोरा-मोठ्यांच्या आशीर्वादाची जोड मिळाली, तर त्याचे मोल द्विगुणित होते. पद्मश्री पुरस्काराने सन्मानित झालेले डॉ. प्रभाकर कोरे यांच्या निवासस्थानी आज शांताई ‘सेकंड चाईल्डहूड’ वृद्धाश्रमातील ज्येष्ठांनी भेट देऊन अत्यंत प्रेमाने त्यांचा सत्कार केला.


प्रतिष्ठित पद्मश्री पुरस्कार मिळाल्याबद्दल डॉ. प्रभाकर कोरे यांचा शांताई वृद्धाश्रमातील ज्येष्ठ नागरिकांनी आज सकाळी त्यांच्या निवासस्थानी भेट घेऊन सत्कार केला. माजी महापौर तथा संस्थेचे कार्याध्यक्ष विजय मोरे यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या या भेटीत वृद्धाश्रमातील आजी-आजोबांनी डॉ. कोरे यांना पारंपरिक पद्धतीने आरती ओवाळून शुभेच्छा दिल्या. समाजमनातील विविध क्षेत्रांत डॉ. कोरे यांनी दिलेल्या अनुपम योगदानाचा गौरव करत, हा सन्मान संपूर्ण बेळगाव जिल्ह्याचा अभिमान असल्याची भावना ज्येष्ठांनी व्यक्त केली.

याप्रसंगी बोलताना विजय मोरे यांनी सांगितले की, थोरामोठ्यांचा आशीर्वाद हा कोणत्याही पुरस्कारापेक्षा श्रेष्ठ असतो. डॉ. कोरे यांच्या सेवाभावी वृत्तीला या शुभेच्छांमुळे अधिक बळ मिळेल, असे विजय मोरे यांनी म्हटले. सत्कार स्वीकारल्यानंतर अत्यंत विनम्रपणे ज्येष्ठांशी संवाद साधताना डॉ. प्रभाकर कोरे यांनी, या प्रेमळ गौरवामुळे मन भरून आले असल्याचे सांगितले. या कार्यक्रमाला पायोनियर बँकेचे अध्यक्ष प्रदीप अष्टेकर, मारिया विजय मोरे यांच्यासह अनेक मान्यवर आणि शांताई संस्थेचे पदाधिकारी उपस्थित होते.



Recent Comments