Belagavi

मराठा विकास महामंडळासाठी किरण जाधव यांचे मुख्यमंत्र्यांना पत्र

Share

​राज्य अर्थसंकल्पाच्या पार्श्वभूमीवर बेळगावचे मराठा नेते किरण जाधव यांनी मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांच्याकडे मराठा समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी भरीव निधीची मागणी केली आहे.

या संदर्भात त्यांनी मुख्यमंत्र्यांना सविस्तर निवेदन पाठवले आहे.
​मराठा समाजाच्या शैक्षणिक आणि आर्थिक प्रगतीसाठी कर्नाटक मराठा विकास महामंडळाला किमान १००० कोटी रुपयांचे अनुदान द्यावे, अशी मागणी किरण जाधव यांनी केली आहे. महामंडळाला सध्या मिळणारा निधी समाजाच्या गरजांच्या तुलनेत अत्यंत तोकडा आहे. त्यामुळे सामाजिक न्यायाची भूमिका घेणाऱ्या मुख्यमंत्र्यांनी आगामी अर्थसंकल्पात मराठा समाजासाठी विशेष आर्थिक पॅकेज जाहीर करावे, असे त्यांनी प्रसिद्धी पत्रकात म्हटले आहे.

​या विशेष निधीद्वारे विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती, उच्च आणि परदेशी शिक्षणासाठी अर्थसाहाय्य, तसेच कृषी आणि पशुसंवर्धनासाठी प्रोत्साहनपर योजना राबवण्यात याव्यात. त्याचबरोबर बेरोजगार तरुणांना स्वयंरोजगार सुरू करण्यासाठी कमी व्याजदरात कर्ज सुविधा उपलब्ध करून द्यावी, अशी विनंतीही जाधव यांनी केली आहे. राज्यातील मराठा समाज शैक्षणिक आणि आर्थिक आव्हानांचा सामना करत असून सरकार सकारात्मक निर्णय घेईल, अशी आशा किरण जाधव यांनी व्यक्त केली आहे.

Tags: