Belagavi

आईच्या विरहाने खचलेल्या व्यक्तीला एच.ई.आर.एफ टीमकडून जीवदान

Share

अवघ्या १५ दिवसांपूर्वी आईचे छत्र हरवलेला मुलगा त्याच दु:खात मृत्यूच्या वाटेवर निघाला होता. मात्र, वेळीच आलेल्या एका फोन कॉलमुळे आणि एका जिगरबाज रक्षकाच्या साहसामुळे आज एका जिवाचे प्राण वाचले आहेत. बेळगाव तालुक्यातील आंबेवाडी गावात पार पडलेल्या थरारक बचाव मोहिमेचा हा सविस्तर वृत्तांत.

बेळगाव तालुक्यातील आंबेवाडी येथील बाबू पांडू सांबरेकर (४१) हे आईच्या निधनाचा धक्का सहन न झाल्याने मानसिक तणावात होते. याच विवंचनेतून त्यांनी गावाजवळील एका विहिरीत उडी घेतली. स्थानिकांनी त्यांना वाचवण्याचा प्रयत्न केला, मात्र यश आले नाही. अखेर तातडीने एच.ई.आर.एफ (H.E.R.F) बचाव पथकाला पाचारण करण्यात आले. घटनेची माहिती मिळताच पथक प्रमुख बसवराज हिरेमठ यांनी अवघ्या ७ मिनिटांत घटनास्थळी धाव घेऊन सर्वांनाच थक्क केले.

कोणत्याही आधुनिक उपकरणांची वाट न पाहता, केवळ कमरेला एक लोखंडी साखळी बांधून बसवराज यांनी खोल विहिरीत झेप घेतली. विहिरीत मृत्यूच्या दारात असलेल्या बाबू सांबरेकर यांना धीर देत त्यांनी अत्यंत सुरक्षितपणे त्यांना बाहेर काढले आणि जीवदान दिले. गेल्या १६ वर्षांपासून निस्वार्थ सेवा देणाऱ्या एच.ई.आर.एफ टीमच्या या ‘वन मॅन आर्मी’ साहसाचे आंबेवाडी ग्रामस्थांनी भरभरून कौतुक करत आभार मानले आहेत.

Tags: