Belagavi

​पंतप्रधानांचा अपमान करणाऱ्या काँग्रेसचा भाजप युवा मोर्चाकडून निषेध

Share

​दिल्लीतील प्रतिष्ठित भारत मंडपम येथे आयोजित ‘एआय’ शिखर परिषदेत युवक काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी केलेल्या अश्लील आंदोलनाचे तीव्र पडसाद बेळगावमध्ये उमटले.

पंतप्रधान मोदींविरोधात घोषणाबाजी आणि काँग्रेस कार्यकर्त्यांच्या वर्तनाचा निषेध करत आज भाजप कार्यकर्त्यांनी काँग्रेस कार्यालयावर मोर्चा काढला.

यावेळी पोलिसांनी आंदोलकांना ताब्यात घेतले.
​दिल्लीतील एआय शिखर परिषदेच्या परिसरात युवक काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी शर्ट काढून निधड्या अंगाने धावत अजब आंदोलन केले होते. पंतप्रधान मोदी आणि डोनाल्ड ट्रम्प यांचे फोटो असलेले शर्ट हातात धरून त्यांनी केलेल्या घोषणाबाजीच्या निषेधार्थ आज बेळगावमधील भाजप कार्यकर्ते रस्त्यावर उतरले. काँग्रेस कार्यालयात घुसण्याचा प्रयत्न करणाऱ्या भाजप नेत्या महंत ओकुंड, शिल्पा केकरे, सविता गुड्डकाई, कृष्णा पाटील यांच्यासह अनेक कार्यकर्त्यांना मार्केट पोलिसांनी वाटेतच अडवून ताब्यात घेतले.

​आंदोलक कार्यकर्त्यांनी यावेळी काँग्रेस विरोधात जोरदार घोषणाबाजी करत आपला संताप व्यक्त केला. “शिखर परिषदेसारख्या जागतिक आणि पवित्र व्यासपीठावर अशा प्रकारचे असभ्य वर्तन करणे हा देशाचा अपमान आहे,” अशी टीका भाजप नेत्यांनी केली. या कृत्यामागे असलेल्या सूत्रधारांना तातडीने अटक करण्याची मागणीही यावेळी करण्यात आली. खबरदारीचा उपाय म्हणून काँग्रेस कार्यालयाभोवती सध्या कडक पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.

Tags: