मराठी भाषा गौरव दिनानिमित्त महाराष्ट्र एकीकरण युवा समिती, बेळगावच्या वतीने १ मार्च रोजी भव्य कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. या सोहळ्यात मराठी चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेते आणि दिग्दर्शक हेमंत ढोमे उपस्थित राहून मार्गदर्शन करणार आहेत.


महाराष्ट्र एकीकरण युवा समितीच्या वतीने जानेवारी महिन्यात घेतलेल्या सामान्यज्ञान स्पर्धेत बेळगाव आणि सीमाभागातील सुमारे ३,००० विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवला होता. या यशस्वी स्पर्धकांचा बक्षीस वितरण सोहळा, आदर्श शाळा पुरस्कार आणि दहावीतील गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार यावेळी केला जाणार आहे.
या कार्यक्रमाला लेखक, दिग्दर्शक आणि अभिनेते हेमंत ढोमे यांची विशेष उपस्थिती लाभणार असून, त्यांच्या उपस्थितीत हा गौरव सोहळा संपन्न होईल.
मराठी शाळा आणि भाषेच्या जागृतीसाठी हेमंत ढोमे यांचे कार्य उल्लेखनीय असून त्यांनी ‘क्रांतिज्योती विद्यालय’, ‘झिम्मा’, ‘बघतोस काय मुजरा कर’ अशा गाजलेल्या चित्रपटांचे दिग्दर्शन आणि लेखन केले आहे. सामाजिक तसेच राजकीय विषयांवर ते कायम आपली परखड मते मांडत असतात. ‘क्षणभर विश्रांती’ या चित्रपटापासून सुरू झालेला त्यांचा प्रवास आज मराठी मनोरंजन विश्वात अत्यंत यशस्वी मानला जातो.
मराठा मंदिर येथे होणाऱ्या या सोहळ्यात हेमंत ढोमे “अस्तित्व मराठी शाळेचे, संवर्धन मराठी भाषेचे” या विषयावर विद्यार्थी आणि पालकांशी संवाद साधणार आहेत. १ मार्च २०२६ रोजी दुपारी ३ वाजता होणाऱ्या या कार्यक्रमाला बेळगावमधील मराठी प्रेमी, शिक्षक, पालक आणि विद्यार्थ्यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन अंकुश केसरकर यांनी केले आहे.


Recent Comments