Belagavi

खानापुरातील डोंबारी समाजाच्या स्मशानभूमीवर अतिक्रमणाचे राजकारण; संतप्त समाजाचे आंदोलन

Share

खानापूर तालुक्यातील शाहुनगर येथे डोंबारी समाजाच्या हक्काच्या स्मशानभूमीवर स्थानिक बड्या प्रस्थांनी ताबा मिळवल्याचा संतापजनक प्रकार उघडकीस आला आहे. या अनधिकृत अतिक्रमणाविरोधात आणि प्रशासकीय दिरंगाईविरोधात आज दलित संघर्ष समितीने बेळगाव जिल्हाधिकारी कार्यालयावर जोरदार निदर्शनं केली.

खानापूर येथील सर्व्हे नंबर ९३/ए १ मध्ये गेल्या तीन शतकांपासून डोंबारी समाज आपल्या पूर्वजांवर अंत्यसंस्कार करत आहे. मात्र, बंद पडलेल्या एका सिरामिक कंपनीच्या नावाचा आडोसा घेऊन काही धनदांडग्यांनी येथील जुनी झाडे तोडून थेट थडग्यांवरच पक्की बांधकामे उभारली आहेत. ही बाब अत्यंत गंभीर असून मृतांच्या सन्मानाचा प्रश्न असल्याचे आंदोलकांनी म्हटले आहे.

या प्रकरणी स्थानिक तहसीलदार आणि नगरपंचायतीकडे अनेकदा तक्रारी करूनही कोणतीही दखल घेतली गेलेली नाही. उलट, हे भूमाफिया पोलिसांच्या मदतीने आणि न्यायालयाची दिशाभूल करून स्मशानभूमीची जागा गिळंकृत करण्याचा प्रयत्न करत आहेत, असा आरोप दलित संघर्ष समितीने आपल्या निवेदनात केला आहे.

यावेळी बोलताना दलित नेते मल्लेश चौगुले म्हणाले, गरिबांच्या जमिनी हडपणाऱ्यांविरुद्ध जिल्हाधिकाऱ्यांनी स्वतः लक्ष घालून या ऐतिहासिक स्मशानभूमीचे संरक्षण करावे. डोंबारी समाजाला त्यांच्या हक्काची ही स्मशानभूमी महसूल दप्तरी नोंद करून देण्यात यावी आणि थडग्यांवर उभारलेली सर्व अवैध बांधकामे तातडीने हटवण्यात यावीत अशी मागणी त्यांनी केली.

जिवंत असताना हक्काचे घर नाही आणि मेल्यावर हक्काची स्मशानभूमी नाही, ही या समाजाची अवस्था अत्यंत दुर्दैवी आहे. प्रशासनाने तात्काळ न्याय दिला नाही तर आम्ही संपूर्ण जिल्ह्यात आंदोलन छेडू, असा इशारा राजशेखर हिंडलगी यांनी दिला.

या अन्यायाकडे दुर्लक्ष करणाऱ्या संबंधित अधिकाऱ्यांवरही कठोर कारवाई करण्याची विनंती निवेदनात करण्यात आली आहे. यावेळी दलित संघर्ष समितीचे पदाधिकारी, डोंबारी समाजातील कार्यकर्ते आणि मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित होते.

Tags: