बेळगावमध्ये जनता दल पक्षाच्या वतीने येत्या २२ फेब्रुवारी रोजी भव्य कार्यकर्ता मेळावा आणि बाईक रॅलीचे आयोजन करण्यात आले आहे. पक्षाची ताकद वाढवण्यासाठी आणि आगामी निवडणुकांचे रणशिंग फुंकण्यासाठी हा मेळावा महत्त्वाचा ठरणार असल्याची माहिती माजी आमदार वीरभद्रप्पा हालहरवी यांनी दिली.

शुक्रवारी बेळगाव येथील कन्नड साहित्य भवनमध्ये आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. ही बाईक रॅली शहरातील सीपीएड मैदानापासून सुरू होईल आणि राणी चन्नम्मा चौकामार्गे गांधी भवन येथे विसर्जित होईल. यानंतर गांधी भवन येथे भव्य मेळावा पार पडणार आहे. या कार्यक्रमाला केंद्रीय मंत्री एच. डी. कुमारस्वामी आणि जेडीएस प्रदेशाध्यक्ष निखिल कुमारस्वामी प्रामुख्याने उपस्थित राहणार आहेत.
बेळगाव जिल्ह्यात जेडीएसची संघटनात्मक बांधणी अधिक मजबूत करणे, हा या मेळाव्याचा मुख्य उद्देश आहे. आगामी तालुका पंचायत, जिल्हा पंचायत आणि ग्रामपंचायत निवडणुकांमध्ये जेडीएस आपले उमेदवार रिंगणात उतरवणार असून, त्यासाठी कार्यकर्त्यांमध्ये चैतन्य निर्माण केले जात असल्याचे वीरभद्रप्पा हालहरवी यांनी सांगितले.
यावेळी सिद्धनगौडा पाटील यांच्यासह पक्षाचे इतर प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते.


Recent Comments