कागवाड तालुक्यातील शेडबाळ येथे ११ व्या शतकातील ऐतिहासिक वारसा लाभलेल्या श्री बसवण्णा देवाच्या यात्रोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. या महोत्सवाचा मुख्य आकर्षण असलेला भव्य रथोत्सव रविवारी, २२ फेब्रुवारी रोजी सायंकाळी संपन्न होणार आहे.


शेडबाळ शहराचे ग्रामदैवत असलेल्या श्री बसवण्णा देवाचा यात्रोत्सव प्रतिवर्षाप्रमाणे यंदाही अत्यंत उत्साहात साजरा होत आहे. महाशिवरात्रीनिमित्त १५ ते २६ फेब्रुवारी या कालावधीत विविध धार्मिक आणि सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आल्याची माहिती मंदिर समितीचे निमंत्रक सुनील पाटील यांनी दिली.
या महोत्सवांतर्गत शनिवार, २१ फेब्रुवारी रोजी सायंकाळी ४ वाजता मंदिर परिसरात महाप्रसादाचे वाटप करण्यात येणार आहे. त्यानंतर रविवार, २२ फेब्रुवारी रोजी सायंकाळी ५ वाजता श्री बसवण्णा देवाची पालखी काढण्यात येईल.या यात्रेचा मुख्य सोहळा म्हणजे सायंकाळी ६ वाजता होणारा रथोत्सव. गावातील पाटील आणि यात्रा कमिटीच्या नेतृत्वाखाली सुमारे तीन टन वजनाचा हा रथ भाविक स्वहस्ते ओढणार आहेत.
सांस्कृतिक कार्यक्रमांतर्गत सोमवार, २३ फेब्रुवारी रोजी रात्री सुभाष हिलगे यांचा ‘वैभव म्युझिकल नाईट’ हा ऑर्केस्ट्रा कार्यक्रम होईल. तसेच २४ फेब्रुवारी रोजी सकाळी बैलांच्या पळण्याच्या शर्यती पार पडतील आणि रात्री श्री बसवेश्वर नाट्य संघातर्फे ‘ग्रामपंचायत गंगव्वा’ या नाटकाचा प्रयोग सादर केला जाईल.
बुधवारी, २५ फेब्रुवारी रोजी पहाटे २ वाजता घोडागाडी शर्यतींचे आयोजन करण्यात आले असून रात्री हलगी वादन स्पर्धा रंगणार आहेत. या सर्व कार्यक्रमांमध्ये भाविकांनी आणि नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभागी होऊन दर्शनाचा लाभ घ्यावा, असे आवाहन अशोक पाटील, अतिक्रांत पाटील, वर्धमान पाटील, सुनील पाटील, विनोद पाटील, अश्वथ पाटील, पद्मवीर पाटील, अरुण शिरदवाडे आणि अशोक विभूती यांनी केले आहे.


Recent Comments