Belagavi

बेळगावात विराट हिंदू संमेलनाचा उत्साह; भव्य बाईक रॅलीने वेधले लक्ष

Share

बेळगाव शहरात २२ फेब्रुवारी रोजी होणाऱ्या ‘विराट हिंदू संमेलना’च्या पार्श्वभूमीवर आज कार्यकर्त्यांनी भव्य बाईक रॅली काढून जोरदार शक्तीप्रदर्शन केले. या संमेलनासाठी शिवाजीनगर भागात जय्यत तयारी सुरू असून संपूर्ण शहरात भगवे वातावरण निर्माण झाले आहे.

बेळगाव शहरात सध्या भगवे वातावरण असून २२ फेब्रुवारी रोजी होणाऱ्या ‘विराट हिंदू संमेलना’च्या निमित्ताने आज कार्यकर्त्यांनी भव्य बाईक रॅली काढली. हिंदू संमेलन समितीच्या वतीने रविवारी सायंकाळी छत्रपती शिवाजीनगर येथे या संमेलनाचे आयोजन करण्यात आले असून त्याचे नियोजन अंतिम टप्प्यात आहे. या पार्श्वभूमीवर जनजागृती करण्यासाठी आयोजित केलेली बाईक रॅली अयोध्या नगर येथून सुरू झाली. त्यानंतर एसपी ऑफिस रोड, सुभाष नगर आणि वीरभद्र नगरमार्गे ही रॅली शिवाजीनगरमधील शालेय मैदानात यशस्वीपणे विसर्जित झाली.

रॅलीदरम्यान कार्यकर्त्यांनी हातात भगवे ध्वज घेऊन दिलेल्या घोषणांनी संपूर्ण शहर दणाणून गेले होते. २२ फेब्रुवारी रोजी सायंकाळी ५ वाजता होणाऱ्या या मुख्य कार्यक्रमात कर्नाटक उत्तर प्रांताचे सहबौद्धिक प्रमुख रामचंद्र जनार्दन एडके मुख्य वक्ते म्हणून मार्गदर्शन करणार आहेत. या संमेलनाला छत्रपती शिवाजीनगर उपनगरातील विविध भागांतून हजारो भाविक आणि नागरिक उपस्थित राहतील, असा विश्वास हिंदू संमेलन समितीने व्यक्त केला आहे.

कार्यक्रमाच्या पार्श्वभूमीवर शहरात कोणतीही अनुचित घटना घडू नये यासाठी पोलीस प्रशासन पूर्णपणे सतर्क झाले आहे. पोलीस उपायुक्त नारायण भरमणी यांच्या नेतृत्वाखाली रॅलीच्या मार्गावर कडेकोट पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी स्वतः घटनास्थळी उपस्थित राहून सुरक्षेचा आढावा घेतला असून शांतता राखण्याचे आवाहन नारायण बरमणी यांनी केले आहे.

Tags: