बागलकोट जिल्ह्यातील इळकल तालुक्यातील तोंडीहाळ गावातील जंगलात एका व्यक्तीची निर्घृण हत्या झाल्याचे उघडकीस आले आहे. अज्ञातांनी शिर धडावेगळे करून मृतदेह फेकून दिल्याने परिसरात प्रचंड दहशतीचे वातावरण पसरले असून पोलीस या प्रकरणाचा कसून तपास करत आहेत.

इळकल तालुक्यातील तोंडीहाळ येथील एका शिक्षण संस्थेजवळील वनक्षेत्रात ही अमानवीय घटना घडली. १८ फेब्रुवारीच्या रात्री स्थानिक नागरिकांना शिर नसलेला मृतदेह आढळल्यानंतर त्यांनी तातडीने पोलिसांना पाचारण केले. मृताची ओळख पटू नये या उद्देशानेच मारेकऱ्यांनी शिर धडावेगळे करून पळवून नेल्याचा प्राथमिक संशय व्यक्त केला जात आहे.
घटनेची माहिती मिळताच बागलकोटचे पोलीस अधीक्षक सिद्धार्थ गोयल यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. तपासासाठी ठसेतज्ज्ञ आणि श्वानपथकाला पाचारण करण्यात आले असून पुरावे गोळा करण्याचे काम सुरू आहे. अद्याप कापलेले शिर सापडले नसल्याने मृताची ओळख पटवणे हे पोलिसांसमोर मोठे आव्हान ठरत आहे.
याप्रकरणी इळकल ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. जुने वैमनस्य किंवा अनैतिक संबंधातून हे हत्याकांड घडले आहे का, या दिशेने पोलीस तपास करत आहेत, असे सिद्धार्थ गोयल यांनी सांगितले.


Recent Comments