Belagavi

परिवहन कर्मचाऱ्यांच्या संपामुळे बेळगावात प्रवाशांचे हाल; बसस्थानक ओस

Share

राज्य परिवहन कर्मचाऱ्यांनी पुकारलेल्या संभाव्य संपामुळे बेळगाव जिल्ह्यात प्रवासी वाहतुकीवर मोठा परिणाम झाला आहे. संपामुळे ऐनवेळी गैरसोय होऊ नये म्हणून प्रवाशांनी प्रवासाचे बेत रद्द केल्याने बेळगावच्या मध्यवर्ती बसस्थानकावर आज शुकशुकाट पाहायला मिळाला.

बेळगाव विभागातून गोवा, महाराष्ट्र आणि कर्नाटकच्या विविध जिल्ह्यांत दररोज सुमारे १,४०० बस धावतात. एकट्या बेळगाव डेपोतून ३०० हून अधिक बसचे संचलन होते. आज कर्मचारी कामावर हजर असले तरी संपाची बातमी वाऱ्यासारखी पसरल्याने प्रवाशांनी बसस्थानकाकडे पाठ फिरवली आहे. त्यामुळे बसस्थानक परिसरात शुकशुकाट पसरला असून अनेक बस रिकाम्याच धावत असल्याचे चित्र आहे.

परिवहन कर्मचाऱ्यांनी आपल्या प्रलंबित मागण्यांबाबत आक्रमक पवित्रा घेतला आहे. “गेल्या ३८ महिन्यांची थकबाकी सरकारने तात्काळ जमा करावी. आमच्या राज्यस्तरीय नेत्यांनी संपाची हाक दिल्यास आम्ही पूर्ण ताकदीने कामावर बहिष्कार टाकू,” असा इशारा कर्मचाऱ्यांनी दिला आहे. सध्या परिस्थिती शांत असली तरी सायंकाळी होणाऱ्या बैठकीत संपाबाबत अधिकृत घोषणा होण्याची शक्यता आहे. हा संप झाल्यास बेळगावातून होणाऱ्या आंतरराज्य वाहतुकीला मोठा फटका बसणार असून प्रवाशांचे अतोनात हाल होणार आहेत.

Tags: