Belagavi

सरकारी महिला अधिकाऱ्याला धमकावणारे तोतया पत्रकार जेरबंद

Share

पत्रकार असल्याचे सांगून सरकारी महिला अधिकाऱ्याला ब्लॅकमेल करणाऱ्या एका तोतया टोळीचा बेळगाव पोलिसांनी पर्दाफाश केला आहे. या प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेऊन जिल्हा न्यायालयाने आरोपींना अधिक चौकशीसाठी तीन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.

बेळगाव शहरातील माळमारुती पोलीस ठाण्याच्या हद्दीत ही कारवाई करण्यात आली. पत्रकार असल्याचे भासवून एका सरकारी महिला अधिकाऱ्याकडे पैशांची मागणी करणाऱ्या काही समाजकंटकांना पोलिसांनी अटक केली आहे. या तोतया पत्रकारांच्या टोळीचा मुख्य सूत्रधार आधीच पोलिसांच्या जाळ्यात अडकला असून, पोलीस आता या टोळीच्या कारवायांचा सखोल तपास करत आहेत. या टोळीने केवळ याच महिला अधिकाऱ्याला नव्हे, तर आणखी किती सरकारी अधिकाऱ्यांना अशा प्रकारे धमकावून पैसे उकळले आहेत, याची धक्कादायक माहिती समोर येण्याची शक्यता आहे.

सध्या आरोपींना ताब्यात घेतलेले माळमारुती पोलीस पुढील तीन दिवसांत या टोळीचे काळे कारनामे चव्हाट्यावर आणणार आहेत. जिल्हा न्यायालयाच्या या आदेशामुळे पोलिसांना तपासासाठी मोठे बळ मिळाले असून, तोतया पत्रकारांच्या त्रासामुळे धास्तावलेल्या अधिकारी वर्गात आता समाधानाचे वातावरण आहे. पोलीस कोठडीत होणाऱ्या चौकशीतून या टोळीमागे काही प्रभावशाली व्यक्तींची नावे समोर येतात का, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Tags: