Belagavi

बेळगावात २०० कोटींच्या सरकारी जमिनीची लूट : भीमप्पा गडाद

Share

बेळगाव शहराच्या मध्यवर्ती भागात असलेली सुमारे २०० कोटी रुपये किमतीची सरकारी जमीन भूमाफियांनी महसूल अधिकाऱ्यांशी संगनमत करून हडपल्याचा खळबळजनक आरोप सामाजिक कार्यकर्ते भीमप्पा गडाद यांनी केला असून याप्रकरणी पुराव्यांसह लोकायुक्तांकडे तक्रार दाखल करून सखोल चौकशीची मागणी केली आहे.

बेळगावमधील श्रीनगर उद्यानाजवळ, पुणे-बेंगळुरू राष्ट्रीय महामार्गाला लागून असलेल्या सर्व्हे नंबर १३१६/३ मधील ५ एकर ३४ गुंठे जमिनीवर भूमाफियांनी डल्ला मारला आहे. सरकारी कागदपत्रांमध्ये ही जागा ‘पोलीस गोळीबार मैदान’ म्हणून नोंद होती. मात्र, राजकीय वरदहस्त आणि भ्रष्ट अधिकाऱ्यांच्या मदतीने मूळ कागदपत्रांत फेरफार करून ही जागा खासगी व्यक्तींच्या नावावर केल्याचे भीमप्पा गडाद यांनी तक्रारीत म्हटले आहे.

विशेष म्हणजे २००२ मध्येच तत्कालीन तहसीलदारांनी या जमिनीच्या नोंदीत अवैध बदल झाल्याबाबत जिल्हाधिकाऱ्यांना पत्राद्वारे सावध केले होते. असे असतानाही कोणतीही कारवाई न झाल्याने भूमाफियांनी २०० कोटींहून अधिक मूल्याची ही जागा स्वतःच्या नावावर करण्याचा घाट घातला आहे. या संदर्भात वारंवार पाठपुरावा करूनही प्रशासनाने दखल न घेतल्याने भीमप्पा गडाद यांनी लोकायुक्तांकडे दाद मागितली आहे. संबंधित खासगी व्यक्तींची नावे हटवून पुन्हा सरकारी नोंद न केल्यास न्यायालयात जाणार असल्याचा इशारा भीमप्पा गडाद यांनी दिला आहे.

Tags: