बदलता काळ आणि वाढती स्पर्धा लक्षात घेता महिला उद्योजकांना आपले उत्पादन ऑनलाइन बाजारपेठेत प्रभावीपणे मांडता यावे, यासाठी ‘परंपरा वुमन प्लॅटफॉर्म’च्या वतीने २८ फेब्रुवारी रोजी एका दिवसाच्या ‘डिजिटल मॅनेजमेंट’ प्रशिक्षण कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे.

शहरातील संगोळी रायण्णा महाविद्यालयात हे प्रशिक्षण होणार असल्याची माहिती डॉ. प्रिया पुराणिक यांनी दिली. बेळगावात आयोजित पत्रकार परिषदेत बोलताना डॉ. प्रिया पुराणिक म्हणाल्या की, आजचे युग हे पूर्णपणे ऑनलाइन झाले आहे. महिलांनी घरी तयार केलेले खाद्यपदार्थ किंवा इतर उत्पादने आधुनिक बाजारपेठेत कशी विकावीत, याचे तंत्र त्यांना अवगत व्हावे या उद्देशाने २०१९ मध्ये ‘परंपरा वुमन प्लॅटफॉर्म’ची स्थापना करण्यात आली. सध्या या व्यासपीठावर ६० हून अधिक सक्रिय सदस्य असून महिलांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत.
हे प्रशिक्षण पूर्णपणे मोफत असून यामध्ये केवळ १०० महिलांना सहभागी होण्याची संधी मिळणार आहे. तज्ज्ञांमार्फत डिजिटल मार्केटिंग आणि मॅनेजमेंटचे सविस्तर मार्गदर्शन केले जाईल, तसेच सहभागी महिलांना प्रमाणपत्रही दिले जाईल. यावेळी लता हुली, शौरीका गरगट्टी, भारती ओडवी यांच्यासह इतर मान्यवर उपस्थित होते.


Recent Comments