Belagavi

बेळगावात शिवजयंतीनिमित्त जिल्हा प्रशासनाकडून शिवरायांना अभिवादन

Share

बेळगाव जिल्हा प्रशासन, जिल्हा पंचायत, महानगरपालिका आणि कन्नड व संस्कृती विभागाच्या वतीने हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराजांची ३९४ वी जयंती उत्साहात साजरी करण्यात आली.

बेळगावमधील डॉ. श्यामाप्रसाद मुखर्जी रोडवरील उद्यानात हा अधिकृत शासकीय सोहळा पार पडला. यावेळी जिल्हाधिकारी मोहम्मद रोशन, शहर पोलीस आयुक्त भूषण बोरासे, महानगरपालिका आयुक्त एम. कार्तिक, कन्नड व संस्कृती विभागाच्या सहाय्यक संचालिका विद्यावती भजंत्री यांच्यासह इतर मान्यवरांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या सिंहासनारूढ मूर्तीला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.

याप्रसंगी बोलताना जिल्हाधिकारी मोहम्मद रोशन आणि पोलीस आयुक्त भूषण बोरासे म्हणाले की, “बेळगावमधील शिवजयंती उत्सव हा संपूर्ण देशासाठी एक आदर्शाचा संदेश देणारा आहे. बेळगाव शहर आणि जिल्ह्यात नेहमीच शांतता आणि सलोखा कायम राहावा,” अशा भावना व्यक्त करत त्यांनी सर्वांना शिवजयंतीच्या शुभेच्छा दिल्या.

या सोहळ्याला दलित नेते मलेश चौगुले, आकाश हलगेकर यांच्यासह विविध संघटनांचे प्रमुख, शिवभक्त आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Tags: