Belagavi

थकीत बिलांसाठी कंत्राटदारांचा सरकारला अल्टिमेटम

Share

राज्य सरकारने ३७ हजार कोटींची बिले थकवल्याने कंत्राटदार आक्रमक झाले असून थकीत देयके तातडीने न मिळाल्यास कामे बंद करून बेंगळुरूच्या फ्रीडम पार्कवर सहकुटुंब बेमुदत धरणे धरण्याचा इशारा बेळगाव जिल्हा कंत्राटदार संघटनेने दिला आहे.

बेळगाव जिल्हा कंत्राटदार संघटनेच्या वतीने आयोजित पत्रकार परिषदेत बोलताना प्रदेशाध्यक्ष आर. मंजुनाथ यांनी सरकारवर जोरदार टीका केली. एकट्या बेळगाव जिल्ह्यात विविध विभागांची ३ हजार ४५८ कोटी रुपयांची बिले प्रलंबित आहेत. या संदर्भात उपमुख्यमंत्री आणि सार्वजनिक बांधकाम मंत्र्यांसोबत चर्चा झाली असली, तरी मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी अद्याप कोणतीही ठोस पावले उचललेली नाहीत. मुख्यमंत्र्यांनी अधिकृत बैठक बोलावून समस्या जाणून घेण्याऐवजी केवळ आश्वासने दिली आहेत. कामासाठी आम्ही आमच्या मालमत्ता गहाण ठेवल्या असून, आगामी अर्थसंकल्पात आमच्या कष्टाचा मोबदला मिळावा, अशी मागणी आर. मंजुनाथ यांनी केली.

राज्यात गेल्या तीन वर्षांपासून ३७ हजार कोटींचा निधी थकीत असून, हा निधी मंजूर करण्यासाठी सध्याच्या सरकारमध्येही कमिशनचा व्यवहार सुरू असल्याचा आरोप करण्यात आला आहे. जुन्या सरकारचे कारण पुढे न करता सध्याच्या सरकारने आपली जबाबदारी स्वीकारावी. जर सरकारने याकडे दुर्लक्ष केले, तर राज्यातील २० ते ३५ हजार कंत्राटदार कामे बंद पाडतील. त्यानंतरही तोडगा न निघाल्यास एप्रिलपासून फ्रीडम पार्कवर सहकुटुंब आंदोलन छेडले जाईल, असा इशारा आर. मंजुनाथ यांनी दिला.

Tags: