कमिशनची प्रथा पूर्वीही होती, आजही आहे आणि भविष्यातही राहील, ते शोधून काढणे अशक्य आहे, असे खळबळजनक विधान सार्वजनिक बांधकाम मंत्री सतीश जारकीहोळी यांनी केले आहे.

बेंगळुरू येथे गुरुवारी प्रसारमाध्यमांशी बोलताना सतीश जारकीहोळी यांनी कंत्राटदारांच्या कमिशनच्या आरोपावर भाष्य केले. यावर तोडगा काढण्यासाठी मुख्यमंत्री आणि लोकायुक्त आहेत, त्यांच्याकडे तक्रार करावी, असे त्यांनी सुचवले. भाजप सरकारने आपल्या कार्यकाळात अर्थसंकल्पीय तरतूद नसतानाही कामांच्या निविदा काढल्या, त्यामुळेच आज देयके प्रलंबित राहण्याची वेळ आली आहे. ही मागील सरकारची चूक असून सिंचन आणि सार्वजनिक बांधकाम विभागात मोठी थकबाकी असल्याचे सतीश जारकीहोळी यांनी सांगितले.
“आम्ही सध्या उपलब्ध अर्थसंकल्पाशी मेळ घालून काम करत आहोत. विरोधक कंत्राटदारांची दिशाभूल करत आहेत, हे मी लवकरच पुराव्यानिशी सिद्ध करेन. आम्ही नवीन कामे दिलेली नाहीत, तर केवळ जुन्या कामांचा समतोल राखत आहोत. माझ्या विभागात १२ हजार कोटींची थकबाकी होती, त्यापैकी ३ हजार कोटी दिले असून ९ हजार कोटी अजून बाकी आहेत,” असे सतीश जारकीहोळी यांनी स्पष्ट केले.
आमदारांच्या परदेश दौऱ्याबाबत बोलताना त्यांनी सांगितले की, “ज्येष्ठ आमदार अनेक वर्षांपासून स्वतःच्या खर्चाने परदेशात जात असतात. कुणी दुबईला तर कुणी युरोपला गेले होते. त्यांच्यावर नियंत्रण ठेवता येत नाही. पक्षात छोटे-मोठे गट असू शकतात, पण आम्ही एकत्र बसून प्रश्न सोडवतो.” तर सत्ता हस्तांतरणाबाबत विचारले असता, वेळ आल्यावर काय ते बघू, आम्हीही तुमच्यासारखीच वाट पाहत आहोत, अशी मिश्किल टिप्पणी सतीश जारकीहोळी यांनी केली.


Recent Comments