Kagawad

उगार खुर्द येथील घरफोडीचा छडा; दोघांना अटक

Share

कागवाड पोलिसांनी उगार खुर्द येथील धाडसी घरफोडीचा छडा लावत दोन सराईत चोरांना बेड्या ठोकल्या आहेत. आरोपींकडून २० लाख रुपये किमतीचे सोन्या-चांदीचे दागिने आणि वाहने जप्त करण्यात पोलिसांना यश आले आहे.

उगार खुर्द येथील रहिवासी जिन्नप्पा श्रीपाल माक्कण्णवर यांनी १० फेब्रुवारी रोजी कागवाड पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली होती. माक्कण्णवर यांचे घर कुलूपबंद असताना चोरांनी कडी-कोयंडा तोडून आत प्रवेश केला होता. घरातील सोन्या-चांदीचे दागिने, हिऱ्याची अंगठी आणि रोख रक्कम असा सुमारे २२ लाख रुपयांचा ऐवज चोरांनी लंपास केला होता.

या घटनेचे गांभीर्य ओळखून जिल्हा पोलीस अधीक्षकांच्या मार्गदर्शनाखाली विशेष तपास पथक नेमण्यात आले होते. संतोष हळ्ळूर आणि राघवेंद्र खोत यांच्या पथकाने तांत्रिक तपासाच्या आधारे उगार खुर्द येथील यासीन नबीसाब सुतार आणि जमीर शौकत अली जमादार या दोन चोरांना अटक केली.

तपासादरम्यान पोलिसांनी आरोपींकडून १४३ ग्रॅम सोने, ८५८ ग्रॅम चांदी आणि चोरीसाठी वापरलेली दुचाकी असा एकूण १९.५८ लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. सध्या आरोपींची रवानगी न्यायालयीन कोठडीत करण्यात आली असून, कागवाड पोलिसांनी अत्यंत कमी वेळात केलेल्या या कामगिरीचे वरिष्ठ स्तरावर कौतुक होत आहे.

Tags: