Belagavi

बेळगावमधील फूल बाजारपेठेचा पेच सुटला; व्यापाऱ्यांची सरकारी मार्केटमध्ये ‘घरवापसी’

Share

बेळगावमधील फुलांच्या घाऊक बाजारपेठेवरून गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेला वाद अखेर संपुष्टात आला आहे. आमदार आसिफ सेठ आणि जिल्हाधिकारी मोहम्मद रोशन यांनी घेतलेल्या कडक भूमिकेनंतर, खासगी बाजारपेठेत गेलेले व्यापारी पुन्हा सरकारी मार्केटमध्ये परतले असून या वादावर पडदा पडला आहे.

बेळगाव कॅन्टोन्मेंट परिसरात सुरू झालेली खासगी बाजारपेठ ‘एपीएमसी’ कायद्याचे उल्लंघन करत असल्याचा आक्षेप व्यापाऱ्यांनी घेतला होता. या पार्श्वभूमीवर आमदार आसिफ सेठ यांनी जिल्हाधिकारी आणि संबंधित विभागांच्या अधिकाऱ्यांसोबत तातडीची बैठक घेतली. कोणत्याही परिस्थितीत नियमबाह्य व्यवहार खपवून घेतले जाणार नाहीत आणि प्रामाणिक व्यापाऱ्यांचे नुकसान होऊ दिले जाणार नाही, असा निर्णय या बैठकीत घेण्यात आला. व्यापाऱ्यांना अधिकृत परवाने देऊन त्यांना सर्व सोयी सुविधा पुरवण्याचे आश्वासन आमदार आसिफ सेठ यांनी यावेळी दिले.

घाऊक व्यापारी आयेशा सनदी यांनी खासगी मार्केटमध्ये गेलेल्या व्यापाऱ्यांशी संवाद साधून त्यांना पुन्हा सरकारी मार्केटमध्ये आणण्यात महत्त्वाची भूमिका बजावली. व्यापाऱ्यांच्या अडीअडचणी सोडवण्यासाठी प्रशासनाने सकारात्मक पाऊल उचलल्याने व्यापाऱ्यांनी समाधान व्यक्त केले आहे.

जिल्हाधिकारी मोहम्मद रोशन यांनी स्पष्ट केले की, अधिकृत सरकारी बाजारपेठ उपलब्ध असताना कोणत्याही खासगी घाऊक बाजाराला परवानगी दिली जाणार नाही. उद्यानविद्या विभागाच्या अंतर्गत असलेल्या मार्केटमध्ये गाळ्यांची संख्या वाढवून तिथेच अधिकृत ‘सब-मार्केट’ सुरू करण्यात येईल. या निर्णयामुळे शेतकऱ्यांना आता कोणत्याही अडथळ्याविना आपला माल अधिकृत बाजारपेठेत विकता येणार आहे.

Tags: