Belagavi

बेळगावच्या ‘बिम्स’ रुग्णालयात परिचारकावर जमावाचा जीवघेणा हल्ला

Share

बेळगावच्या ‘बिम्स’ रुग्णालयात एका मानसिक रुग्णाने कर्तव्य बजावणाऱ्या परिचारकाचा चावा घेतला, त्यानंतर रुग्णाच्या नातेवाईकांनी परिचारकावर सामूहिक हल्ला केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या घटनेच्या निषेधार्थ आणि कर्मचाऱ्यांच्या सुरक्षेसाठी ‘बिम्स’च्या नर्सिंग स्टाफने आज रुग्णालयासमोर तीव्र निदर्शने केली.

‘बिम्स’मधील सुपर स्पेशालिटी रुग्णालयात पाणी आणण्याच्या कारणावरून एका मानसिक रुग्ण तरुणीने वाद घातला आणि ड्युटीवर असलेल्या परिचारकाच्या हाताचा चावा घेतला. यावेळी तरुणीच्या नातेवाईकांनी परिचारक बसवराज कबाडगी यांना अमानुषपणे मारहाण केली, ज्यामध्ये ते गंभीर जखमी झाले आहेत.

दिवसरात्र प्रामाणिक सेवा बजावणाऱ्या कर्मचाऱ्यांवर असे हल्ले होणे दुर्दैवी असून, बसवराज कबाडगी यांच्यावरील हल्ल्याचा आम्ही निषेध करतो. प्रशासनाने तातडीने पोलिसांत तक्रार देऊन कर्मचाऱ्यांना पूर्ण सुरक्षा पुरवावी, अशी मागणी नर्सिंग ऑफिसर खादीर मुजावर यांनी केली आहे.

रुग्णालयाचे संचालक अशोककुमार शेट्टी यांनी दिलेल्या माहितीनुसार, तरुणीने दुसऱ्या वॉर्डातून पाणी आणण्यावरून वाद घातला आणि कर्मचाऱ्याचा चावा घेतला. यानंतर नातेवाईकांनी गैरसमजातून कर्मचाऱ्यावर हल्ला केला. याप्रकरणी एपीएमसी पोलिसांत तक्रार दाखल करण्यात आली असून जिल्हाधिकारी व पोलीस आयुक्तांना सुरक्षेसाठी पत्र लिहिण्यात आले आहे.

प्रशासनाने तक्रार दाखल करण्याचे आश्वासन दिल्यानंतर कर्मचाऱ्यांनी आपले आंदोलन तात्पुरते मागे घेतले आहे. मात्र, ठोस कारवाई न झाल्यास पुन्हा उग्र आंदोलन छेडण्याचा इशारा कर्मचाऱ्यांनी दिला आहे.

Tags: