बेळगाव शहरात स्वच्छता राखण्यासाठी महानगरपालिका प्रशासनाने आता कठोर पावले उचलण्यास सुरुवात केली आहे. वॉर्ड क्रमांक ४४ मध्ये स्वतः महापालिका आयुक्तांनी धाड टाकून रस्त्यावर कचरा टाकणाऱ्यांना चांगलाच दणका दिला असून संबंधितांना ५ हजार रुपयांचा दंड ठोठावला आहे.

महानगरपालिका आयुक्त कार्तिक एम. यांनी आज सकाळी वॉर्ड क्रमांक ४४ मधील मार्केट परिसराला भेट देऊन पाहणी केली. यावेळी काही व्यावसायिक आणि नागरिकांनी कचरा कुंडीचा वापर न करता थेट रस्त्यावरच कचरा फेकल्याचे आयुक्तांच्या निदर्शनास आले. हा प्रकार पाहून आयुक्तांनी तीव्र संताप व्यक्त केला आणि स्वच्छतेचे नियम धाब्यावर बसवणाऱ्यांना जागेवरच ५ हजार रुपयांचा दंड भरण्यास भाग पाडले.
यावेळी वॉर्डाचे नगरसेवक आनंद चव्हाण आणि पर्यावरण अधिकारी हनुमंत कलादगी यांच्यासह पालिकेचे कर्मचारी उपस्थित होते. केवळ दंड आकारणे हा आमचा उद्देश नसून शहर स्वच्छ ठेवणे ही प्रत्येक नागरिकाची जबाबदारी आहे, असे आयुक्तांनी यावेळी स्पष्ट केले. मार्केट परिसरात कचऱ्याचे योग्य व्यवस्थापन करण्याच्या सूचनाही त्यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिल्या.
शहरात ठिकठिकाणी अस्वच्छता पसरवणाऱ्यांवर यापुढेही अशाच प्रकारची कडक कारवाई सुरू राहणार असल्याचे संकेत पालिकेने दिले आहेत. या धडक कारवाईमुळे मार्केट परिसरातील बेशिस्त कचरा फेकणाऱ्यांचे धाबे दणाणले असून, आयुक्तांच्या या भूमिकेचे जागरूक नागरिकांकडून स्वागत होत आहे.


Recent Comments