Belagavi

बेळगावात मुलांच्या अपहरणाचा प्रयत्न? पिरनवाडीतील चार मुले येळ्ळूरच्या शेतात सापडली

Share

बेळगाव ग्रामीण भागात मुलांचे अपहरण करणाऱ्या टोळीची सक्रियता वाढली आहे की काय, अशी भीती निर्माण करणारी घटना समोर आली आहे. पिरनवाडी येथील चार लहान मुलांना एका अज्ञात व्यक्तीने सहलीचे आमिष दाखवून दुचाकीवरून नेले आणि त्यानंतर त्यांना येळ्ळूरच्या शेतात सोडून पळ काढला.

मिळालेल्या माहितीनुसार, पिरनवाडी येथील ७ ते ८ वर्षे वयोगटातील चार शालेय मुले मंगळवारी गल्लीत खेळत होती. यावेळी एका अज्ञात इसमाने “तुम्हाला सहलीला घेऊन जातो” असे सांगून या चौघांना आपल्या दुचाकीवर बसवले. मात्र, काही वेळाने या व्यक्तीने मुलांना येळ्ळूर गावाजवळील एका निर्जन शेतात सोडून दिले आणि तिथून पळ काढला. शेतात ही मुले घाबरलेल्या अवस्थेत फिरत असताना कार्लेकर नावाच्या एका सतर्क शेतकऱ्याचे त्यांच्याकडे लक्ष गेले. त्यांनी तातडीने ग्रामस्थांना आणि पोलिसांना याबद्दल माहिती दिली.

दुसरीकडे, आपली मुले घरातून बेपत्ता झाल्याने हवालदिल झालेल्या पालकांनी पोलीस ठाण्यात धाव घेतली होती. पोलिसांनी तातडीने चक्रे फिरवून माहिती मिळवली आणि येळ्ळूर येथील विठ्ठल-रुक्मिणी मंदिराजवळून मुलांना आपल्या ताब्यात घेतले. मंगळवारी रात्री ८ वाजेच्या सुमारास पोलिसांनी कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करून या मुलांना पालकांच्या स्वाधीन केले.

या घटनेमुळे संपूर्ण पिरनवाडी आणि येळ्ळूर परिसरात घबराट पसरली आहे. त्या अज्ञात व्यक्तीचा हेतू काय होता आणि तो मुलांना वाटेतच सोडून का पळाला, याचा तपास बेळगाव ग्रामीण पोलीस करत आहेत. पालकांनी आपल्या मुलांकडे लक्ष द्यावे, असे आवाहनही पोलिसांनी केले आहे.

Tags: