बेळगाव उपनगरातील हिंदू संमेलन समितीच्या वतीने आयोजित ‘विराट हिंदू संमेलन’ मंगळवारी मोठ्या उत्साहात पार पडले. धर्म आणि संस्कृतीच्या संवर्धनासाठी हिंदू समाजाने संघटित होणे काळाची गरज असल्याचे आवाहन या संमेलनाद्वारे करण्यात आले.


खडेबाजार येथील संयुक्त महाराष्ट्र चौकात आयोजित या सोहळ्याला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. संमेलनाचे मुख्य आकर्षण ठरली ती म्हणजे भव्य मिरवणूक. दुपारी कित्तूर राणी चन्नम्मा चौकातील गणेश मंदिरापासून या मिरवणुकीला प्रारंभ झाला. पारंपारिक आणि सांस्कृतिक वेशभूषा परिधान केलेले शेकडो भाविक या मिरवणुकीत सहभागी झाले होते. ढोल-ताशांच्या गजरात निघालेल्या या दिंडीने संपूर्ण बेळगाव शहर भगवेमय झाले होते.

संमेलनाचे मुख्य वक्ते शिवचरित्रकार डॉ. शिवरत्न शेटे यांनी आपल्या भाषणातून उपस्थितांना मार्गदर्शन केले. “आपली परंपरा, नीती आणि विचार जपण्यासाठी हिंदू समाजाने नेहमी जागरूक असायला हवे. आपण संघटित राहिलो तरच समाज बलशाली होईल,” असे विचार डॉ. शिवरत्न शेटे यांनी मांडले. बेंगळुरू येथील श्री गोरा महासंस्थान मठाचे श्री मंजुनाथ भारती स्वामीजी यांचे दिव्य सान्निध्य या सोहळ्याला लाभले.

या कार्यक्रमाचे नियोजन समितीचे उपाध्यक्ष दिगंबर पवार आणि सचिव जोतिबा पालभ यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले होते. व्यासपीठावर गजानन मिसाळे, अनिल अष्टेकर, प्रकाश हलगेकर यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. संमेलनाच्या समारोपानंतर आयोजित महाप्रसादाचा अनेक हिंदू बांधवांनी लाभ घेतला.


Recent Comments