बेळगावचे दक्षिण काशी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या श्री कपिलेश्वर मंदिराप्रमाणेच अत्यंत जागृत देवस्थान असलेल्या वडगावमधील श्री मल्लिकार्जुन मंदिरात महाशिवरात्री उत्सव मोठ्या थाटामाटात साजरा झाला. गेल्या आठ दिवसांपासून सुरू असलेल्या विविध धार्मिक कार्यक्रमांची सांगता मंगळवारी भव्य महाप्रसादाने करण्यात आली.


बेळगाव वडगाव येथील चावडी गल्लीत असलेल्या श्री मल्लिकार्जुन मंदिरात १० ते १७ फेब्रुवारी या कालावधीत शिवरात्री उत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. या निमित्ताने श्री गुरुसिद्ध स्वामीजी आणि मंजुनाथ मेघनाळ यांची प्रवचने भाविकांसाठी पर्वणी ठरली. महाशिवरात्रीच्या दिवशी मंदिरात विशेष पूजा आणि महारुद्राभिषेक करण्यात आला. सोमवारी श्री मल्लिकार्जुन देवाची पालखी वझे गल्ली, चावडी गल्ली, सप्पार गल्ली यासह विविध भागातून वाजतगाजत काढण्यात आली. मंगळवारी हुणसीकोळ मठाचे श्री सिद्धबसव महास्वामीजी यांच्या हस्ते महाप्रसाद वाटपाचा शुभारंभ झाला. यावेळी २० हजारांहून अधिक भाविकांनी महाप्रसादाचा लाभ घेतला.

याच काळात कुरुहिनशेट्टी युवक मंडळाच्या वतीने विविध सांस्कृतिक आणि क्रीडा स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते, ज्यामुळे उत्सवाची रंगत अधिकच वाढली. स्थानिक नागरिकांच्या सहकार्यामुळे हा उत्सव अत्यंत शिस्तबद्ध पद्धतीने पार पडला असून वडगाव परिसरात भक्तीचे वातावरण निर्माण झाले आहे, असे श्रीधर तिगडी यांनी स्पष्ट केले.

या भव्य सोहळ्याच्या यशस्वी नियोजनासाठी मंदिर समितीच्या सदस्यांनी विशेष परिश्रम घेतले. यामध्ये बसवराज अत्तीमरडी, निजगुणी बस्सापुरे, मल्लिकार्जुन यळ्ळूर यांच्यासह अनेक प्रमुखांनी सर्व व्यवस्था चोख राहील याची दक्षता घेतली.


Recent Comments