बेळगावमधील वैभव नगर सेक्टर क्रमांक २ मधील श्रीराम कॉलनीतील रहिवासी मूलभूत सुविधांपासून वंचित ऐन उन्हाळ्याच्या तोंडावरच पिण्याचे पाणी, रस्ते आणि ड्रेनेजची व्यवस्था कोलमडली असून वारंवार विनंती करूनही अधिकारी दुर्लक्ष करत असल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे.

वैभव नगरमधील श्रीराम कॉलनीत पाण्याची भीषण टंचाई निर्माण झाली असून रहिवाशांना थेंब थेंब पाण्यासाठी वणवण करावी लागत आहे. येथे १० ते ११ दिवसांतून एकदाच पाणीपुरवठा होतो, त्यातच वॉटरमन “आम्हाला पाहिजे तेव्हाच पाणी सोडणार” अशी मुजोरी करत असल्याची तक्रार नागरिकांनी केली आहे. याप्रकरणी जेजेएम अधिकारी आणि ठेकेदार एकमेकांकडे बोटे दाखवून जबाबदारी झटकत आहेत. अधिकाऱ्यांच्या या बेजबाबदारपणामुळे संतप्त झालेल्या महिलांनी आज रिकाम्या घागरी घेऊन प्रशासनाचा निषेध केला.
वैष्णवी महिला मंडळाच्या प्रमुख सविता किल्लेकर यांनी आपली व्यथा मांडताना सांगितले की, गेल्या अनेक वर्षांपासून ही पाणीटंचाई सुरू आहे. ड्रेनेजच्या दुरवस्थेमुळे सांडपाणी रस्त्यावर वाहतेय आणि विहिरींमध्येही मिसळत आहे. ग्रामपंचायतीने काम सुरू केले असले तरी यात्रा जवळ येत असतानाही काम पूर्ण होण्याची चिन्हे नाहीत.
कॉलनीतील रस्ते आणि ड्रेनेजचे काम अशास्त्रीय पद्धतीने झाल्याचा आरोप करत रहिवाशांनी संताप व्यक्त केला आहे. पीडीओ आणि संबंधित अधिकाऱ्यांकडे अनेकदा तक्रारी करूनही काहीच प्रतिसाद मिळालेला नाही. या संदर्भात कॉलनीतील रहिवासी प्रशांत कित्तूर यांनी प्रशासनाला इशारा दिला आहे की, आमच्या समस्यांची त्वरित दखल न घेतल्यास ग्रामपंचायतीसमोर उग्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा येथील रहिवाशांनी दिला आहे.


Recent Comments