Belagavi

शारीरिक सौष्ठव स्पर्धेत आरपीडी महाविद्यालयाचे यश

Share

बेळगावच्या एसकेई संस्थेच्या आरपीडी कला आणि वाणिज्य महाविद्यालयाने राणी चन्नम्मा विद्यापीठाच्या ‘बेस्ट फिजिक’ स्पर्धेत सलग ३१ व्या वर्षी सर्वसाधारण विजेतेपद स्वतःकडे कायम राखत अजिंक्य कामगिरी केली आहे.

बेळगावच्या आरपीडी कॉलेजच्या के. एम. गिरी सभागृहात पार पडलेल्या आरसीयुबी एकविभागीय शरीरसौष्ठव स्पर्धेत आरपीडी कॉलेजने १३ गुण मिळवून ‘ओव्हरऑल चॅम्पियनशिप’वर आपले नाव कोरले. गेल्या तीन दशकांपासून आपले जेतेपद कायम राखण्याचा दुर्मिळ विक्रम या महाविद्यालयाने केला आहे. या कार्यक्रमाचे उद्घाटन माजी विद्यार्थी अश्विनकुमार निंगण्णवर यांच्या हस्ते झाले. यावेळी आंतरराष्ट्रीय पंच अजित सिद्धण्णवर, आरसीयु क्रीडा संचालक डॉ. जगदीश गस्ती आणि प्राचार्य डॉ. अभय पाटील यांच्यासह मान्यवर उपस्थित होते.

वैयक्तिक विभागात आरपीडी कॉलेजच्या किशोर कुरबार याने ‘बेस्ट पोझर’चा बहुमान पटकावला. विविध वजनी गटात श्रीधर हंडे (६५ किलो – द्वितीय), किशोर कुरबार (७० किलो – तृतीय), विनीत हणमशेट (७५ किलो – प्रथम) आणि अशोक काकतीकर (७५ किलो – द्वितीय) यांनी यश मिळवून महाविद्यालयाच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला आहे. शारीरिक शिक्षण संचालक डॉ. रामकृष्ण एन. यांच्या मार्गदर्शनाखाली मिळालेल्या या यशाबद्दल महाविद्यालयीन कर्मचारी आणि विद्यार्थ्यांनी आनंद व्यक्त केला आहे.

Tags: