Kagawad

ऐनापूरमधील कबड्डीच्या अटीतटीच्या सामन्यात बेळगाव संघ विजयी

Share

माजी उपमुख्यमंत्री लक्ष्मण सवदी यांच्या वाढदिवसानिमित्त ऐनापूर येथे आयोजित अखिल भारतीय ‘ए’ ग्रेड पुरुष कबड्डी स्पर्धेत बेळगावच्या संघाने बाजी मारली आहे.

बेळगावच्या प्रणय पुजारी फाउंडेशनने अंतिम सामन्यात बारामतीच्या अनिकेतन फाउंडेशनचा ४ गुणांनी पराभव करत विजेतेपदावर आपले नाव कोरले. ऐनापूर येथील सरकारी कन्नड शाळेच्या मैदानावर १५ आणि १६ फेब्रुवारी रोजी या रंगतदार स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते.

स्पर्धेचे आयोजक आणि लक्ष्मण सवदी यांचे सुपुत्र चिदानंद सवदी यांनी यावेळी खेळाडूंचे कौतुक केले. कबड्डीची पंढरी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या कागवाड तालुक्यातील ऐनापूरमधील क्रीडाप्रेमींचा उत्साह पाहून मनाला आनंद झाला, अशी भावना त्यांनी व्यक्त केली.

अंतिम सामन्यात बेळगावच्या प्रणय पुजारी फाउंडेशन आणि बारामतीच्या अनिकेतन पाटील फाउंडेशन यांच्यात काट्याची टक्कर पाहायला मिळाली. सोमवार रात्री उशिरापर्यंत चाललेल्या या थरारक सामन्यात बेळगावने ४२ गुण मिळवले, तर बारामतीच्या संघाला ३८ गुणांवर समाधान मानावे लागले. या विजयामुळे बारामती संघाचे विजेतेपदाचे स्वप्न भंगले असून बेळगावचा संघ चॅम्पियन ठरला आहे.

विजेत्या बेळगाव संघाला १ लाख रुपये रोख आणि चषक देऊन गौरविण्यात आले. द्वितीय क्रमांकावर राहिलेल्या बारामतीच्या अनिकेतन पाटील फाउंडेशनला ७५ हजार रुपये, तर तृतीय क्रमांकावरील बारामती अकॅडमीला ५० हजार रुपयांचे पारितोषिक मिळाले. बंगळुरूच्या रायझिंग बुल्स संघाने चतुर्थ क्रमांक पटकावत २५ हजार रुपयांचे बक्षीस आपल्या नावावर केले.

यावेळी उत्कृष्ट चढाईपटू म्हणून बारामतीचा वीरेंद्र, उत्कृष्ट पकडपटू म्हणून रायझिंग बुल्सचा रजत आणि स्पर्धेतील सर्वोत्कृष्ट खेळाडू म्हणून बेळगावच्या गणेशचा गौरव करण्यात आला.

याप्रसंगी युवा नेते शिवकुमार सवदी, प्रवीण गाणिगेर, अरुण गाणिगेर, संजय कुचनुरे, चमनराव पाटील यांच्यासह अनेक मान्यवर आणि क्रीडाप्रेमी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Tags: