Belagavi

एडीजीपी आलोक कुमार यांची हिंडलगा कारागृहात अचानक भेट

Share

बेळगाव येथील ऐतिहासिक हिंडलगा मध्यवर्ती कारागृहात एडीजीपी आलोक कुमार यांनी अनपेक्षित भेट देऊन सुरक्षेचा आढावा घेतला. यावेळी त्यांनी हलगर्जीपणा करणाऱ्या अधिकाऱ्यांच्या कार्यपद्धतीवर तीव्र नाराजी व्यक्त करत शिस्तभंगाचा इशारा दिला आहे.

कारागृह आणि सुधार सेवा विभागाचे राज्य पोलीस महासंचालक आलोक कुमार यांनी मंगळवारी बेळगाव तालुक्यातील हिंडलगा मध्यवर्ती कारागृहाला अचानक भेट दिली. कारागृहाच्या अंतर्गत आणि बाह्य सुरक्षा व्यवस्थेची त्यांनी सखोल पाहणी केली. कैद्यांवरील देखरेख आणि कर्मचाऱ्यांच्या कार्यपद्धतीवर त्यांनी ताशेरे ओढले. कारागृहात कोणतेही अवैध प्रकार आढळल्यास संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांना थेट जबाबदार धरले जाईल, असा इशारा आलोक कुमार यांनी दिला.

तपासणी दरम्यान कारागृहातील तांत्रिक सुरक्षा व्यवस्थेवर गंभीर चर्चा करण्यात आली. हिंडलगा कारागृहात ५जी जॅमर यंत्रणा बसवण्यात आली असूनही काही ठिकाणी मोबाईल नेटवर्क मिळत असल्याच्या तक्रारी समोर आल्या होत्या. याशिवाय कारागृहाच्या भिंतीबाहेरून मोबाईल फोन आणि अंमली पदार्थ आत फेकले जात असल्याच्या आरोपांची त्यांनी गंभीर दखल घेतली. अशा प्रकारांना तातडीने आळा घालण्यासाठी कडक पावले उचलण्याचे निर्देश त्यांनी दिले.

सुरक्षा व्यवस्थेत कोणतीही शिथिलता सहन केली जाणार नाही, असे बजावत आलोक कुमार यांनी निगराणी यंत्रणा अधिक सक्षम करण्यास सांगितले. या महत्त्वाच्या बैठकीस कारागृह विभागाच्या उत्तर विभागाचे आयजीपी टी.पी. शेषा, आयजीपी चेतन सिंग राठोड, पोलीस आयुक्त भूषण बोरसे, एसपी के. रामराजन आणि कारागृह अधीक्षक कृष्णमूर्ती यांच्यासह इतर वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

Tags: