बेळगावच्या बेनकनहळ्ळी परिसरात कौटुंबिक वादातून दोन गटांत भीषण हाणामारी झाली आहे. सांगलीतील एका कुटुंबावर काही तरुणांच्या टोळक्याने घरात घुसून हल्ला केला असून, या प्रकरणी पोलिसांनी सात जणांना बेड्या ठोकल्या आहेत.

बेनकनहळ्ळीत येथे राहणाऱ्या अविनाश साळुंखे यांच्या घरात सोमवारी रात्री सांगली, मुचंडी आणि मुत्यानट्टी येथील तरुणांनी बेकायदेशीरपणे प्रवेश करून गोंधळ घातला. अविनाश साळुंखे यांच्या बहिणीचा पती दीपक याच्यासोबत सुरू असलेल्या जुन्या वादातून ही घटना घडली आहे. १४ फेब्रुवारी रोजी झालेली तडजोड फिस्कटल्याने संतापलेल्या तरुणांनी साळुंखे कुटुंबावर हल्ला चढवला. या मारहाणीत अविनाश साळुंखे, बालाजी साळुंखे आणि मीना नाईक हे जखमी झाले असून त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत सात आरोपींना ताब्यात घेतले असून त्यांच्याकडील कार आणि दुचाकी जप्त केल्या आहेत. या प्रकरणातील एकूण १२ आरोपींपैकी उर्वरित पाच जणांचा शोध सुरू आहे. हल्लेखोरांवर रौडीशिटर अंतर्गत गुन्हे दाखल करण्याच्या सूचना पोलीस आयुक्त भूषण बोरसे यांनी दिल्या असून, सखोल तपासानंतरच संपूर्ण वस्तुस्थिती समोर येईल, असे भूषण बोरसे यांनी स्पष्ट केले आहे.


Recent Comments