बागलकोट जिल्ह्याच्या राजकारणात आता विजयेंद्र विरुद्ध निराणी असा नवा संघर्ष सुरू झाला आहे. बदामी विधानसभा मतदारसंघाच्या उमेदवारीबाबत विधान करणाऱ्या माजी मंत्री मुरगेश निराणी यांना भाजप प्रदेशाध्यक्ष बी. वाय. विजयेंद्र यांनी जाहीर व्यासपीठावरून खडे बोल सुनावले आहेत.

बिळगी शहरात आयोजित ‘जी राम जी’ कार्यक्रमात भाजप प्रदेशाध्यक्ष बी. वाय. विजयेंद्र यांनी निराणींच्या उपस्थितीतच कार्यकर्त्यांना कडक सूचना दिल्या. “पुढील निवडणुकीत भाजपला जिंकायचे असेल, तर कार्यकर्त्यांनी आधी स्वतःच्या बूथवर लक्ष दिले पाहिजे. विजापूर, जमखंडी किंवा बागलकोटमध्ये काय चालले आहे, याची चिंता करण्याची गरज नाही. आधी स्वतःच्या बूथची मतदार यादी तपासा,” अशा शब्दांत त्यांनी निराणींना टोला लगावला.

विजयेन्द्रांच्या या विधानाला विशेष राजकीय पार्श्वभूमी आहे. कालच मुरगेश निराणी यांनी बदामी मतदारसंघाबाबत भाष्य करताना, “तिथल्या नेत्यांनी एकमताने नाव दिल्यास उमेदवारी मिळवून देणे आणि निवडून आणणे ही माझी जबाबदारी आहे,” असे विधान केले होते. स्वतःचा मतदारसंघ सोडून शेजारच्या मतदारसंघात रस दाखवणाऱ्या निराणींना विजयेन्द्रांनी “परक्या मतदारसंघाची उठाठेव नको, स्वतःचा बूथ भक्कम करा” असा थेट संदेश दिला आहे. बिळगीतील हा राजकीय कलगीतुरा सध्या जिल्ह्यात चर्चेचा विषय ठरला आहे.


Recent Comments