Kagawad

२७ फेब्रुवारीला विजापुरात केंद्रीय मंत्री कुमारस्वामींचा ‘जनता मेळावा’

Share

माजी पंतप्रधान एच. डी. देवेगौडा आणि केंद्रीय मंत्री एच. डी. कुमारस्वामी यांनी कर्नाटकातील बळीराजाच्या समृद्धीसाठी मोठे योगदान दिले आहे, असे प्रतिपादन चिकोडी जिल्हा जेडीएस अध्यक्ष तथा माजी आमदार के. पी. मगेण्णवर यांनी केले. शनिवारी कागवाड येथे आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते.

येत्या २७ फेब्रुवारी रोजी विजापूर येथे कुमारस्वामी यांच्या प्रमुख उपस्थितीत ‘जनता मेळावा’ आयोजित करण्यात आला आहे. या मेळाव्याच्या नियोजनासाठी आणि कार्यकर्त्यांना निमंत्रण देण्यासाठी ही पत्रकार परिषद बोलावण्यात आली होती, अशी माहिती के. पी. मगेण्णवर यांनी दिली.

बेळगाव जिल्हा जेडीएस अध्यक्ष शंकर माडलगी यांनी जेडीएस पक्षाच्या स्थापनेला २५ वर्षे पूर्ण झाल्यानिमित्त या विशेष सोहळ्याचे आयोजन करण्यात आल्याचे सांगितले. माजी पंतप्रधान देवेगौडा यांनी साखर कारखान्यांना परवाने दिल्यानेच आज बेळगाव जिल्ह्यात साखर कारखान्यांचे जाळे निर्माण झाले असून शेतकऱ्यांची आर्थिक स्थिती सुधारली आहे, असे शंकर माडलगी यांनी नमूद केले.

यावेळी जेडीएस अल्पसंख्याक आघाडीचे प्रदेश उपाध्यक्ष तथा माजी आमदार शाहजहान डोंगरगाव यांनी काँग्रेस सरकारवर निशाणा साधला. काँग्रेसमध्ये सध्या मुख्यमंत्रिपदासाठी संघर्ष सुरू असून त्यांना विकासाशी काहीही देणेघेणे नाही. सरकारच्या गॅरंटी योजनांमुळे राज्याची तिजोरी रिकामी झाली असून २०२८ मध्ये राज्यात भाजप-जेडीएस-एनडीए युतीचे सरकार येईल, असा विश्वास शाहजहान डोंगरगाव यांनी व्यक्त केला.

याप्रसंगी तालुका अध्यक्ष मल्लिकार्जुन गुंजेगावी, चिकोडी जिल्हा एसटी आघाडीचे अध्यक्ष रमेश नाईक, जिल्हा निमंत्रक प्रमोद पुजारी, महांतेश अवटी यांच्यासह जेडीएसचे अनेक पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते.

Tags: