Kagawad

शांतिसागर विद्यापीठाचा १२ वा वार्षिक स्नेहसंमेलन सोहळा उत्साहात

Share

ऐनापूर येथील शांतिसागर इंग्रजी माध्यम विद्यापीठाच्या १२ वे वार्षिक स्नेहसंमेलन उत्साहात पार पडले. अथणीचे डीवायएसपी प्रशांत मुन्नोळी, शाळेचे माजी विद्यार्थी डॉ. संजय निकम, पीएसआय सुभाष यांच्यासह अनेक मान्यवरांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम पार पडला.

या कार्यक्रमास मुख्य अतिथी म्हणून अथणीचे डीवायएसपी प्रशांत मुन्नोळी हे उपस्थितीत होते. यावेळी बोलताना ते म्हणाले, शिक्षण क्षेत्रातील वाढत्या स्पर्धेमुळे विद्यार्थी मानसिक तणावाखाली वावरत आहेत. या तणावामुळे काही विद्यार्थी आत्महत्येसारखे टोकाचे पाऊल उचलत असून, ही बाब अत्यंत चिंताजनक आहे. अशा घटना रोखण्यासाठी प्रत्येक शाळेत विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करणारे समुपदेशक असणे आवश्यक आहे, असे प्रतिपादन प्रशांत मुन्नोळी यांनी केले.

संस्थेचे उपाध्यक्ष पायप्पा कुडवकलगी यांनी संस्थेच्या प्रगतीचा आढावा घेतला. दिवंगत अध्यक्ष रवींद्र गाणिगेर आणि सर्व संचालकांच्या सहकार्याने ही संस्था नावारूपाला आली आहे. सध्या ३६ वर्गांमध्ये तज्ज्ञ शिक्षकांच्या मार्गदर्शनाखाली १३०० विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. या संस्थेतून आतापर्यंत ६० इंजिनिअर्स, २५ डॉक्टर्स आणि अनेक पोलीस व सैन्य अधिकारी घडल्याची माहिती पायप्पा कुडवकलगी यांनी दिली.

शांतिसागर शिक्षण संस्था ही ग्रामीण भागातील कुटुंबांसाठी आशेचा किरण ठरली आहे. येथील विद्यार्थी आज उच्च पदांवर कार्यरत आहेत. पालकांनी मुलांच्या शिक्षणासाठी जास्तीत जास्त प्रोत्साहन द्यावे, असे आवाहन संस्थेचे अध्यक्ष अरुण गाणिगेर यांनी केले.

समारंभात विशेष यश संपादन करणाऱ्या विद्यार्थ्यांचा गौरव करण्यात आला. लहानपणीच पालकांचे छत्र हरवल्यानंतर आजीच्या मायेखाली वाढून ‘नीट’ परीक्षेत यश मिळवत कारवार वैद्यकीय महाविद्यालयात प्रवेश मिळवणाऱ्या विनोद नंदगावे याचा विशेष सत्कार करण्यात आला. तसेच जिल्हा स्तरावर यश मिळवलेले संजना पाटील, प्रणव हिरेमठ आणि श्रीनिधी एरंडोले यांचाही सन्मान करण्यात आला.

यावेळी संस्थेचे सचिव अनुप शेट्टी, संचालक मंडळाचे सदस्य, मुख्याध्यापक मोहन मोळेकर आणि इतर मान्यवर उपस्थित होते.

Tags: