राज्य सरकारने यशस्वी हजार दिवस पूर्ण केल्यानिमित्त हावेरी येथे आयोजित भव्य मेळाव्यात मुख्यमंत्री सिद्धरामय्या आणि उपमुख्यमंत्री डी.के. शिवकुमार यांनी विरोधकांवर कडाडून प्रहार केला. एक लाख कुटुंबांना जमिनीच्या हक्कपत्रांचे वाटप करून ‘भूमी गॅरंटी’चे आश्वासन पूर्ण केल्याचे जाहीर करत, हे सरकार दिलेला शब्द पाळणारे असल्याचे मुख्यमंत्र्यांनी ठणकावून सांगितले.


काँग्रेस सरकारला सत्तेत येऊन एक हजार दिवस पूर्ण झाल्याच्या पार्श्वभूमीवर हावेरीत आज ‘साधना मेळावा’ पार पडला. या सोहळ्यात लाभार्थ्यांना जमिनीचे मालकी हक्क प्रदान करण्यात आले, मात्र हा सोहळा केवळ सरकारी कार्यक्रम न राहता भाजप-जेडीएस युतीला दिलेले चोख राजकीय प्रत्युत्तर ठरला.


मेळाव्याला संबोधित करताना मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी भाजपवर प्रखर टीका केली. जे आमच्या गॅरंटी योजनांवर टीका करत होते, तेच आज त्याचे अनुकरण करत आहेत. भाजपने सत्तेत असताना १० टक्के आश्वासनेही पूर्ण केली नाहीत, मात्र आम्ही २४३ आश्वासने पूर्ण केली आहेत. राज्याची तिजोरी रिकामी झाल्याचा खोटा आरोप करणाऱ्यांनी हे लक्षात घ्यावे की, आम्ही गॅरंटीसाठी १.१८ लाख कोटी रुपये खर्च केले आहेत, असे मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी स्पष्ट केले.

उपमुख्यमंत्री डी.के. शिवकुमार यांनी विरोधकांना सवाल करत विचारले की, भाजप आणि जेडीएसने जनतेसाठी एक तरी कायमस्वरूपी योजना दिली आहे का? काँग्रेसच्या गॅरंटी योजना आता देशाचे मॉडेल बनल्या आहेत. विकासाला आणि आमच्या जनहितकारी योजनांना कधीच अंत नाही, मात्र विरोधकांच्या खोट्या प्रचाराचा शेवट आता सुरू झाला आहे, अशी प्रतिक्रिया डी.के. शिवकुमार यांनी व्यक्त केली.



Recent Comments