Belagavi

बेळगावच्या फूल मार्केट वादावर पडदा; खाजगी बाजाराकडे पाठ फिरवून शेतकरी पुन्हा सरकारी बाजारपेठेकडे!!!

Share

बेळगावच्या किल्ला तलाव परिसरातील सरकारी फूल मार्केटमधील व्यापाऱ्यांच्या लढ्याला अखेर यश आले आहे. नियम धाब्यावर बसवून सुरू झालेल्या खाजगी मार्केटमुळे अडचणीत आलेले शेतकरी आणि घाऊक व्यापारी आता पुन्हा सरकारी बाजारपेठे कडे वळले आहेत.

बेळगावच्या किल्ला तलाव परिसरात सरकारी मार्केटला समांतर असे नवीन खाजगी फूल मार्केट सुरू केल्यामुळे सरकारी बाजारपेठ संकटात सापडली होती. सरकारी नियम मोडून हे खाजगी मार्केट उभारले गेल्याची बाब येथील व्यापारी आणि बेळगावच्या समाजसेवकांनी सीईओंच्या निदर्शनास आणून दिली होती. तसेच याविरुद्ध आंदोलनाचा इशाराही दिला होता. या पार्श्वभूमीवर सीईओंनी दोन्ही मार्केटची पाहणी केली. आज खाजगी मार्केटला पाठ फिरवून व्यापाऱ्यांनी पुन्हा सरकारी मार्केटचा रस्ता धरला.

“आम्ही पहिल्यापासून सरकारी मार्केटमध्येच फुलांचा व्यापार करतो, इथे कोणतीही अडचण नाही. नवीन मार्केटमुळे आमच्या व्यापारावर परिणाम झाला होता, हेच मार्केट आमच्यासाठी सोयीचे आहे,” अशी प्रतिक्रिया एका महिला शेतकऱ्याने व्यक्त केली.

“काही दिवसांपूर्वी खाजगी लोकांनी नवीन मार्केट उभारले, परंतु तिथे अनेक गैरसोयी असल्याने आम्ही आमचा व्यापार सरकारी मार्केटमध्येच सुरू ठेवला आहे. स्वतंत्र मार्केट न उभारता इथेच गरज असल्यास अधिक गाळे बांधावेत आणि दरवर्षी लिलाव करण्याऐवजी येथील व्यापाऱ्यांना कायमस्वरूपी दुकाने द्यावीत,” असे मत शेतकऱ्यांनी व्यक्त केले.

खाजगी मार्केटमुळे शेतकरी सरकारी मार्केटमध्ये येत नसल्याने येथील व्यापारी पेचात पडले होते. मात्र, आता शेतकऱ्यांची समजूत काढल्याने त्यांनी पुन्हा सरकारी घाऊक फूल मार्केटची वाट धरली आहे. “आमच्या लढ्याला यश आले असून आम्ही एकजुटीने कोणत्याही संकटाचा सामना करण्यास तयार आहोत,” असे आयेशा सनदी यांनी म्हटले.

खाजगी मार्केटच्या वादामुळे ओस पडलेले सरकारी मार्केट पुन्हा सुरू झाल्याने व्यापारी आणि शेतकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण पसरले आहे.

Tags: