राज्यात काँग्रेसमधील मुख्यमंत्री बदलाच्या चर्चेला नवे वळण मिळाले आहे. डी.के. शिवकुमार यांच्या समर्थनार्थ मैदानात उतरलेल्या नेत्यांविरुद्ध आता गृहमंत्री जी. परमेश्वर यांनी उघडपणे शड्डू ठोकला आहे. हायकमांडच्या सूचनांचे उल्लंघन करून विधान करणाऱ्या नेत्यांविरुद्ध तक्रार करण्याचा पवित्रा परमेश्वर यांनी घेतला आहे.
बेंगळुरू येथे प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना गृहमंत्री जी. परमेश्वर यांनी नेतृत्वाच्या मुद्द्यावरून सुरू असलेल्या वादावर तीव्र आक्षेप नोंदवला. विशेषतः डी.के. शिवकुमार यांच्या बाजूने विधान करणाऱ्या आमदार चन्नराज हट्टीहोळी यांच्यावर त्यांनी जोरदार निशाणा साधला. हायकमांडने या विषयावर ‘तोंड बंद ठेवा’ अशा कडक सूचना देऊनही नेते वारंवार भाष्य करत आहेत, ही बाब योग्य नाही, असा इशारा जी. परमेश्वर यांनी दिला.
मुख्यमंत्रीपदाची चर्चा वारंवार उगाळत बसण्याऐवजी सर्वांनी प्रशासनावर लक्ष केंद्रित करणे हिताचे ठरेल, असा सल्लाही त्यांनी दिला. पक्षाची शिस्त मोडून वक्तव्ये करणाऱ्यांबाबत आपण हायकमांडशी चर्चा करणार असल्याचे सांगत जी. परमेश्वर यांनी थेट दिल्लीकडे तक्रार करण्याचे संकेत दिले आहेत. या घडामोडींमुळे काँग्रेसमधील अंतर्गत संघर्ष अधिकच तीव्र झाल्याचे स्पष्ट झाले आहे.


Recent Comments