काँग्रेस सरकार हे ‘पर स्क्वेअर फीट’ भ्रष्टाचार करणारे सरकार असल्याची घणाघाती टीका भाजप प्रदेशाध्यक्ष बी.वाय. विजयेंद्र यांनी बागलकोट येथील पत्रकार परिषदेत केली. राज्यात लवकरच मुख्यमंत्री बदलणार असल्याचे सांगत त्यांनी सत्ताधारी पक्षावर जोरदार निशाणा साधला.

काँग्रेस सत्तेवर येण्यापूर्वी जनतेने ज्या अपेक्षा ठेवल्या होत्या, त्या आता पूर्णपणे फोल ठरल्या आहेत. मुख्यमंत्री सिध्दरामय्या यांनी उत्तर कर्नाटककडे पूर्णपणे दुर्लक्ष केले असून, केवळ ‘अहिंदा’चा जप करत मागासवर्गीयांच्या विकासाचा त्यांना विसर पडला आहे. विशेषतः विणकरांच्या समस्यांकडे सरकारने जाणीवपूर्वक पाठ फिरवली आहे. बंगळुरूमध्ये या सरकारची ओळख ‘पर स्क्वेअर फीट भ्रष्टाचार’ करणारे सरकार अशी झाली असून, गॅरंटी योजनांचे दोन महिन्यांचे पैसे थकीत असतानाही मुख्यमंत्री गप्प का, असा सवाल बी.वाय. विजयेंद्र यांनी उपस्थित केला.

राज्याची आर्थिक स्थिती खालावलेली असताना आमदारांना विकासनिधी देण्याऐवजी परदेश दौऱ्यांचे भाग्य लाभत आहे, असा टोला विजयेंद्र यांनी लगावला. केवळ अबकारी कर वसुलीसाठी किराणा दुकानांतही मद्यविक्रीला परवानगी देऊन सरकार राज्याला ‘तळीरामांचा प्रदेश’ बनवत असल्याची भीती त्यांनी व्यक्त केली. राज्यात मुख्यमंत्री बदल १०० टक्क्यांहून अधिक निश्चित असून, आर्थिक परिस्थिती इतकी रसातळाला गेली आहे की, कोणीही मुख्यमंत्री झाले तरी विकास होणे अशक्य आहे. आम्हाला सत्तेची घाई नाही, त्यांनीच उरलेला काळ पूर्ण करून दाखवावा, असे आव्हान बी.वाय. विजयेंद्र यांनी दिले.


Recent Comments