नवी दिल्लीत काँग्रेस नेत्या सोनिया गांधी यांची भेट घेतल्यानंतर उपमुख्यमंत्री डी.के. शिवकुमार यांनी प्रसारमाध्यमांच्या प्रश्नांवर तीव्र संताप व्यक्त केला आहे. राज्यातील राजकीय घडामोडींबाबत विचारलेल्या प्रश्नांना उत्तर देताना त्यांनी पत्रकारांना आपल्या खास शैलीत खडेबोल सुनावले.
दिल्लीत सोनिया गांधी यांच्याशी प्रदीर्घ चर्चा केल्यानंतर शिवकुमार यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी ते म्हणाले की, पक्षश्रेष्ठींसोबत अनेक विषयांवर गुप्त चर्चा होते आणि अशा सर्व गोष्टी सार्वजनिकरित्या रस्त्यावर उभे राहून सांगता येत नाहीत. पक्षाचे अंतर्गत मुद्दे आणि प्रशासकीय कामांबाबत हायकमांडला पूर्ण कल्पना देण्यात आली असून, त्यातील प्रत्येक गोष्टीचा खुलासा करण्याची आवश्यकता नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
प्रसारमाध्यमांच्या प्रश्नांवर अधिक आक्रमक होत शिवकुमार यांनी “आम्ही दिल्लीत हवा खायला आलेलो नाही, तर राजकारण करण्यासाठीच आलो आहोत,” अशा शब्दांत टोला लगावला. श्रेष्ठींशी झालेल्या भेटीचा अर्थच सर्व विषयांवर चर्चा झाली असा होतो, त्यामुळे प्रत्येक मुद्द्याचे स्पष्टीकरण देणे बंधनकारक नाही, असेही त्यांनी ठणकावून सांगितले.
या भेटीमुळे राज्यातील आगामी राजकीय बदलांच्या शक्यतेने पुन्हा एकदा वेग घेतला असून, शिवकुमार यांच्या या विधानामुळे विरोधकांनाही मोठा संदेश मिळाला आहे.


Recent Comments