Belagavi

बेळगावात रंगला ‘चिगुरु’ महोत्सवाचा उत्साह

Share

बेळगावमधील संत मीरा इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये ‘युथ फॉर सेवा’ संस्थेच्या वतीने ‘चिगुरु किड्स कार्निव्हल’ मोठ्या उत्साहात पार पडला. या महोत्सवात १,३०० हून अधिक सरकारी शाळेतील मुलांनी आपल्या सुप्त गुणांचे प्रदर्शन करत सर्वांचे लक्ष वेधून घेतले.

बेळगावमधील अनगोळ येथील संत मीरा शाळेचे प्रांगण मुलांच्या किलबिलाटाने आणि सांस्कृतिक विविधतेने न्हाऊन निघाले होते. ‘युथ फॉर सेवा’ बेळगाव चॅप्टरने आयोजित केलेल्या या ‘चिगुरु किड्स कार्निव्हल २०२५-२६’ मध्ये ३५ सरकारी शाळांमधील सुमारे १,३०० विद्यार्थी सहभागी झाले होते.

छोटा सायंटिस्ट, माईम, रांगोळी, योगासने आणि लोकनृत्य यांसारख्या एकूण २२ विविध स्पर्धांमध्ये मुलांनी अत्यंत उत्साहाने भाग घेऊन आपली सर्जनशीलता दाखवली. मुलांच्या सर्वांगीण विकासासाठी अशा व्यासपीठांची अत्यंत गरज असल्याचे मत पॉझिट्रॉन इंजिनीअरिंगचे प्रवीण कुमार जी आणि अशोक आयरन ग्रुपचे मनोज बेळगली यांनी व्यक्त केले.

या भव्य कार्यक्रमाच्या यशासाठी २८० हून अधिक महाविद्यालयीन स्वयंसेवक आणि शेकडो शिक्षकांनी परिश्रम घेतले. समारोप समारंभात विजेत्या विद्यार्थ्यांना पारितोषिके आणि पदके देऊन सन्मानित करण्यात आले. जयभारत फाउंडेशन आणि पॉझिट्रॉन इंजिनीअरिंग या संस्थांनी या कार्यक्रमाला प्रायोजक म्हणून सहकार्य केले होते. हा महोत्सव केवळ एक स्पर्धा नसून मुलांमध्ये आत्मविश्वास निर्माण करणारा एक सामाजिक उपक्रम ठरल्याचे आयोजकांनी म्हटले आहे.

Tags: